मुंबई : ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीला बुधवारी नौदलाच्या ‘स्पीड बोटी’ने धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातातील जखमीपैकी काही जणांना जेएनपीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. त्यानंतर या जखमींना घरी पोहोचविण्यासाठी जेएनपीटी, महसूल विभाग आणि न्हावा शेवा पोलिस ठाणे यांनी दोन बसगाड्या उपलब्ध केल्या. उपचाराअंती जखमींनी या बसगाड्यांतून घर गाठले.
‘नीलकमल’ दुर्घटनेतील जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेएनपीटी रुग्णालयात एकूण ५७ जणांना नेण्यात आले होते. यामधील ५६ जणांची प्रकृती स्थिर होती, तर एका ८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर जखमींवर वैद्यकीय उपचार केल्यानंतर बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास डॉक्टरांनी जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे घोषित केले. त्यानंतर जेएनपीटी, महसूल विभाग आणि न्हावा शेवा पोलिस ठाणे यांच्या मदतीने उपलब्ध करण्यात आलेल्या दोन बसमधून या जखमींना घरी पोहोचविण्यात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. काही पर्यटक नातेवाईकांकडे राहायला आले होते, तर काही हॉटेलमध्ये वास्तव्यास होते.
मृत झालेल्या आठ वर्षांच्या मुलाची ओळख पटली नव्हती. त्यामुळे रुग्णालयाने या मुलाचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला. एक वृद्ध व्यक्ती आपल्या नातवाला शोधत तेथे आले होते. त्यांनी मृतदेह दाखविण्यात आला. हा मुलगा आपला नातू असल्याचे समजताच त्यांना धक्काच बसला. नाशिकमधील निधिश राकेश अहिरे (८) आई-वडिलांसोबत घारापुरीला गेला होता. निधिशच्या आई-वडिलांचाही या अपघातात मृत्यू झाला.
हेही वाचा…मुंबई भेट अखेरची ठरली…बोटीच्या डागडुजीसाठी दीपक हैदराबादहून मुंबईत आला होता
परदेशी तरुण तरुणी सुखरूप
‘नीलकमल’ बोटीमधून जर्मनीमधील तरूण-तरूणी घारापुरी येथे जात होते. अपघातानंतर बचाव कार्यादरम्यान त्यांना अन्य बोटीवरून जेएनपीटी रुग्णालयात आणण्यात आले होते. या दोघांवर जेएनपीटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर बसने त्यांना मुंबईत राहत असलेल्या हॉटेलमध्ये सोडण्यात आले.