Mumbai Boat Capsized News: मुंबईच्या समुद्रात बुधवारी घडलेल्या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला असून ३ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघातातून जवळपास १०० जणांना वाचवण्यात यश आलं असलं, तरी १३ जणांचा जीव घेणाऱ्या या अपघातासाठी नेमकं काय कारण ठरलं? याचा शोध आता घेतला जात आहे. अपघातावेळचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याअनुषंगाने तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी नौदलाच्या स्पीडबोटच्या चालकाविरोधात गुन्हादेखील दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं बुधवारी?
मुंबईजवळच्या समुद्रात एलिफंटाच्या दिशेने संध्याकाळच्या सुमारास प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाल्याने ही दुर्घटना घडली. नौदलाच्या एका स्पीडबोटनं या प्रवासी बोटीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघाताचे प्रवासी बोटीतील प्रवाशांनीच काढलेले काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्या व्हिडीओमध्ये नौदलाची स्पीडबोट थेट प्रवासी बोटीला येऊन धडकल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे नौदलाच्या स्पीडबोटीमुळेच हा अपघात झाल्याचं स्पष्ट असून ही बोट या प्रवासी बोटीला कशी धडकली? यासंदर्भात सखोल चौकशी केली जात आहे.
नौदलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या स्पीडबोटवर नवे इंजिन लावण्यात आले होते. त्या इंजिनची चाचणी घेतली जात होती. यावेळी इंजिनमध्ये बिघाड झाला आणि ही बोट प्रवासी बोटीवर आदळली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संध्याकाळी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान उल्लेख केला. यासंदर्भात सखोल तपास करण्यासाठी नौदलाकडून एका समितीची स्थापना करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे.
नव्या इंजिनाची चाचणी
“इंजिन बदलासारखा मोठा बदल जेव्हा आम्ही स्पीडबोटमध्ये करतो, तेव्हा त्याची सर्व निकषांनुसार काटेकोरपणे चाचणी घेतली जाते. यावेळी संबंधित इंजिन उत्पादित करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधीही आमच्यासोबत असतात. उदाहरणार्थ जर उत्पादक कंपनीने दावा केला की ते इंजिन १४० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा गाठू शकतं, तर त्यांना सोबत घेऊन आम्ही ती बोट तेवढी वेगमर्यादा गाठते की नाही, याची चाचणी करतो. त्याचप्रकारची चाचणी बुधवारीही केली जात होती”, असं नौदलाच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त स्पीडबोटवर नवीन इंजिन बसवल्यानंतर तिची चाचणी घेताना बोटीवर सहाजण होते. यात उत्पादक कंपनीच्या चार प्रतिनिधींचाही समावेश होता. चाचणी सुरू झाल्यानंतर बोटचालकाचं बोटीवरचं नियंत्रण सुटलं आणि बोट नीलकमल या प्रवासी बोटीला जाऊन धडकली. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी बोटचालकासह बोटीवर असणाऱ्या सर्व सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
इंजिन उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींचा मृत्यू
या बोटीमध्ये उत्पादक कंपनीचे चार प्रतिनिधी आणि नौदलाचे दोन अधिकारी होते. चाचणीवेळी झालेल्या अपघातात नौदल अधिकारी महेंद्र सिंग शेखावत व उत्पादक कंपनीचे दोन प्रतिनिधी प्रवीण शर्मा व मंगेश यांचा मृत्यू झाल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असून इतर दोघांवर किरकोळ उपचार चालू आहेत, अशीही माहिती समोर आली आहे.
“ही दुर्घटना घडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत नौदलाची स्पीडबोट प्रवासी बोटीला धडक देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. नाथाराम चौधरी नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ काढला होता. तेच या प्रकरणातील तक्रारदार आहेत”, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.