मुंबई: नीलकमल बोटीवरील सुविधांचा अभाव, गोंधळ, नियमांची पायमल्ली यांमुळे अधिक हानी झाली आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून समुद्रमार्गे जहाजाने पर्यटक हे एलिफंटा लेणी तसेच अलिबाग येथे मोठ्या संख्येने जात असतात, मात्र अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन बोटी मार्गस्थ होतात. दुर्घटनाग्रस्त नीलकमल बोटही त्याला अपवाद नव्हती. नियमानुसार बोटीतील प्रत्येक प्रवाशाला लाईफ जॅकेट मिळणे बंधनकारक आहे. प्रवाशांनी ते प्रवासा दरम्यान घालणेही अपेक्षित आहे. मात्र, नीलकमल बुडताना अनेक प्रवाशांना लाईफ जॅकेट्स मिळू शकली नाहीत, अशी माहिती या अपघातातून वाचलेल्या प्रवाशांनी दिली.
हेही वाचा : प्रवासी बोटीला जलसमाधी, नौदलाच्या ‘स्पीड बोटी’ची धडक; १३ मृत्युमुखी
बोटीवर नव्वदपेक्षा अधिक प्रवासी होते. मात्र कर्मचारी पाच ते दहाच होते. अपघात झाल्यावर बोटीवर गोंधळ झाला. ती परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी, लाईफ जॅकेटचा वापर, आपत्कालीन परिस्थितीत काय करावे हे सांगण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ बोटीवर नव्हते. बोटीची क्षमता ८० प्रवाशांची असताना त्यावर शंभरपेक्षा अधिक प्रवासी असल्याचेही समजते आहे. दुर्घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारीत झाल्यानंतर समुद्रमार्गे जहाजाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.