मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याची माहिती देणारा दूरध्वनी केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी गुरूवारी गुन्हा दाखल केला. संबंधित गुन्हा नवी मुंबईतील तुर्भे पोलिसांना वर्ग करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा >>>“वरळीच्या आमदारांना पेग, पेंग्विन आणि…”, आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंवर टीकास्र

मुंबईमधील अंधेरी येथील इन्फिनिटी मॉल, जुहूमधील पीव्हीआर मॉल आणि सहारा हॉटेल विमानतळावर बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा दूरध्वनी करणाऱ्याने केला होता. त्यानंतर सहार विमानतळ पोलीस, जुहू, आंबोली आणि बांगूर नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तपासणी केली. मात्र कोणतीही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू सापडली नाही.

हेही वाचा >>>दादर-स्वारगेट ‘शिवशाही’ महागली ; एसटीची उद्यापासून १० टक्के हंगामी भाडेवाढ

नवी मुंबईतील ११२ या हेल्पलाईनवर मंगळवारी रात्री हा दूरध्वनी आला होता. नवी मुंबई पोलिसांनी याबाबची माहिती मुंबई पोलिसांना दिली. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपण गोवा सीबीआयमधून आर्यन सिंघानिया बोलत असल्याचे सांगून मुंबईत इन्फिनिटी मॉल अंधेरी, पीव्हीआर मॉल जुहू आणि सहारा हॉटेल विमानतळावर बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा केला होता. याप्रकरणी आता दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीविरोधात मानवी जीवास धोका निर्माण करणे, अफवा पसरवणे व तोतयागिरी करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई पोलीस दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षात कार्यरत महिला पोलीस शिपायाच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पुढील तपासासाठी नवी मुंबईच्या तुर्बे पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीने स्वतः गोवा सीबीआयमधून बोलत असल्याचे सांगितल्यामुळे याप्रकरणी तोतयागिरीचेही कलम लावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader