मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतलेली मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे प्रगतिपथावर आहेत. संबंधित कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. मात्र, बोरिवलीतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत.

अनेक महिन्यांपासून रस्त्यांवर खोदकामे सुरू असल्यामुळे संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. स्थानिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गेले अनेक महिने रस्त्यांची कामे संथगतीने सुरू असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

खड्डेमुक्त मुंबईचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरणाला वेग दिला आहे. आतापर्यंत महापालिकेच्या हद्दीतील १,३३३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. यात उपनगरांतील आरे रोड, अंधेरी कुर्ला जोड रस्ता, नारायण दाभोलकर मार्ग, सर पोचखानवाला मार्ग, शाहिद भगतसिंग मार्गापासून नेव्ही नगरला जोडणाऱ्या नानाभाई मुस आणि शहर परिसरातील अन्य प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे.

दरम्यान, यंदा रस्ते काँक्रीटीकरणाची कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच ३१ मे अखेरपर्यंत पूर्ण झालीच पाहिजेत, अशी तंबी महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. असे असताना बोरिवली येथील रस्ते काँक्रीटीकरण संथ गतीने होत आहे. गेल्या अनेक महिने रस्त्यांची कामे सुरू न झाल्याने नागरिक धुळीनेे हैराण आहेत. पालिकेच्या कामाबाबत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. पद्मानगर, चिकूवाडी परिसरातील जॉगर्स पार्क, न्यू लिंक रोड आदींवरील खोदकाम केलेल्या रस्त्यांमुळे स्थानिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ता रोधक (बॅरिकेडिंग) उभारल्यामुळे रस्त्याला वळसा घालून नागरिकांना जावे लागत आहे. रस्त्यांच्या कामांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले असून धुळीमुळे अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. परिसरात अनेक महिन्यांपासून रस्त्यांची कामे जैसे थे आहेत. त्यामुळे महापालिकेतर्फे सुरू असलेल्या कामांची गती लक्षात घेता येत्या ३१ मेपर्यंत कामे पूर्ण होण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना शुद्ध हवेऐवजी धुळीचा सामना करावा लागत असून लवकरच ही समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

महानगरपालिकेने दोन टप्प्यात रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. अनेक ठिकाणी कामांना वेग देण्यात आला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही कामे संथ गतीने सुरू आहेत. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा प्रवास त्रासदायक होतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Story img Loader