Mumbai Rain Update Today मुंबई : मुंबई आणि परिसरात आज पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा कोसळू लागला आहे. पुढील तीन ते चार तासांत मुंबईत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईत आणि उपनगरांत पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार तास मुंबईत पावसाची संततधार सुरू राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सकाळी ५:३० वाजेपर्यंत शहरात ५१.८ मिमी , तर उपनगरांत २७ मिमी पावसाची नोंद झाली. पहाटेपासून उपनगरातील बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, गोरेगाव, खार आणि वांद्रे परिसरात पावसाने जोर वाढला आहे. येथे मागील एक तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. तसेच शहरातील मलबार हिल, चर्चगेट, कुलाबा, नरिमन पॉइंट या परिसरात देखील जोरदार पाऊस पडत आहे.

हेही वाचा…‘घाटकोपरमधे होर्डिंग कोसळून १७ मृत्यूंची घटना देवाच्या…’ आरोपी भावेश भिंडे यांचा उच्च न्यायालयात जामीन अर्ज

दरम्यान, राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता कायम आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मोसमी पावसाचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे असून कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा कायम असल्यामुळे राज्यातील काही भागात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Story img Loader