Mumbai Rain Update Today मुंबई : मुंबई शहर तसेच उपनगरांत रविवारी मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला असून आज पहाटे देखील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, पुढील तीन चार तासांत मुंबईतील तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईत सलग चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवारी संपूर्ण दिवसभर हजेरी लावलेल्या पावसाचा मध्यरात्रीपासून पुन्हा जोर वाढला आहे. रविवारी रात्री ११:३० वाजल्यापासून उपनगरातील कांदिवली, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव या परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. अजूनही येथे पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, पुढील तीन चार तासांत पावसाचा जोर काही भागात आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत या १२ तासांत काही भागांत जवळपास १५० पेक्षा अधिक मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये ट्रॉम्बे – १९६ मिमी, घाटकोपर १९१ मिमी, चेंबूर १८६ मिमी, वडाळा १७४ मिमी तसेच शिवडी येथे १६० मिमी पावसाची नोंद झाली.
हेही वाचा…पीक कर्जाबाबतचे आदेश व्यापारी बँकांनी धुडकावले; अडवणुकीने विदर्भातील शेतकरी सावकारांच्या दारात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात सध्या पाऊस सक्रिय झाला आहे. कोकण तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. तसेच तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असताना मोसमी वाऱ्यांचा आस दक्षिणेकडे कायम आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा आहे याचाच परिणाम म्हणून सध्या मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे.
आज पावसाचा अंदाज
मुसळधार ते अतिमुसळधार
रायगड, रत्नागिरी, सातारा
मुसळधार
मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग,पुणे, कोल्हापूर</p>
वादळी वाऱ्यासह पाऊस
अकोला, अमरावती , भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, वाशिम, यवतमाळ
हेही वाचा…कारण राजकारण: विक्रोळीत शिवसेनेच्या दोन गटांत लढत?
हलका ते मध्यम
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सांगली , सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली , नांदेड, लातूर