उधारीवर घेतलेल्या सुमारे ६३ लाख रुपये किंमतीच्या हिऱ्यांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हिऱ्यांचा व्यवहार करणारा दलाल भरत मांजीभाई गांगानीला सुरत येथून अटक केली. गेल्या नऊ महिन्यांपासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. त्याने फसवणुकीच्या रक्कमेतून खरेदी केलेली मोटरगाडी पोलिसांनी जप्त केली. भरतने अन्य काही हिरे व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे का? याचा पोलीस तपास करीत आहेत.
कुरिअरने ६३ लाख रुपयांचे हिरे पाठवून द्या अशी विनंती केली होती –
पंकज हिम्मतभाई फडियाद्रा हे सांताक्रुज परिसरात वास्तव्यास असून ते व्यवसायाने हिरे व्यापारी असून अनेक वेळा ते हिरे दलालमार्फत हिऱ्यांची विक्री करतात. वांद्रे येथील बीकेसी परिसरात त्यांचे एक कार्यालय असून याच कार्यालयातून त्यांचे सर्व व्यवहार चालतात. भरत हा त्यांचा परिचित हिरे दलाल असून गेल्या दहा वर्षांपासून ते भरतला ओळखतात. अनेक वेळा त्यांनी भरतला विक्रीसाठी हिरे दिले होते. या हिऱ्याचे पैसे त्याने दिलेल्या मुदतीत दिले होते. त्यामुळे त्याच्यावर त्यांचा विश्वास होता. ते ऑक्टोंबर २०२१ मध्ये त्यांच्या कार्यालयात आला होता. चेन्नईतील एक ग्राहक असून त्यांना हिऱ्यांची गरज आहे असे सांगून त्याने त्यांच्याकडून नमुना म्हणून काही हिरे घेतले. तीन दिवसांनी त्याने त्यांना फोन करुन ग्राहकाला हिरे आवडले असून तुम्ही कुरिअरने ६३ लाख रुपयांचे हिरे पाठवून द्या अशी विनंती केली. त्यामुळे त्यांनी त्याला कुरिअरमार्फत हिरे पाठवले. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने हिरे परत केले नाही किंवा हिऱ्याच्या विक्रीतून आलेले रक्कम कार्यालयात जमा केली नाही. वारंवार फोन करुन तो विविध कारण सांगून त्यांना टाळत होता. नंतर त्याने त्याचा मोबाइल बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पंकज फडियाद्रा यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात भरत गांगानीविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली.
पोलिसांचे पथक सुरतला रवाना झाले आणि आरोपीला अटक करण्यात आली –
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ६३ लाख रुपये किंमतीच्या हिऱ्यांचा अपहार करून हिरे व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच या प्रकरणाचा तपास बीकेसी पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. हे प्रकरण हाती येताच पोलिसांनी भरतचा शोध सुरू केला. ही शोधमोहीम सुरू असताना भरत हा सुरत शहरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच हे पथक सुरतला रवाना झाले आणि भरतला अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. शनिवारी दुपारी त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.