मुंबईत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांनी आत्महत्या केली आहे. पारस पोरवाल यांनी इमारतीच्या २३ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस दाखल झाले असून, तपास सुरु आहे.
पारस पोरवाल दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी भायखळा येथील आपल्या राहत्या इमारतीच्या २३ व्या मजल्यावरुन उडी घेऊन आयुष्य संपवलं. दरम्यान त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याची माहिती मिळालेली नाही. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट अद्याप सापडलेली नाही.
पोलीस सध्या कुटुंबासह नातेवाईक, मित्रांकडे चौकशी करत असून ते कोणत्या तणावात होते का याची माहिती घेत आहेत. दरम्यान, या आत्महत्येमुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.