मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्धल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला तसेच जखमी रहिवाशांची कांदिवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे जाऊन विचारपूस केली.
पालक मंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनीही जखमींची भेट घेत त्यांची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांशी चर्चा केली तसेच मदत व बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले.अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचाव कार्य करीत होते. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील जखमींवर तातडीने रुग्णालयांत हलवून शासनाच्या खर्चाने उपचार करावेत हे निर्देशही दिले.
आणखी वाचा- Mumbai Building Collapse: मुंबईत रहिवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू; सात जखमी
मुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मालाड पश्चिमेला असणाऱ्या न्यू कलेक्टर कंपाऊंड येथे ही दुर्घटना घडली आहे. चारमजली इमारत शेजारच्या घरांवर कोसळली असल्याची माहिती मिळाली असून यानंतर आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.
आणखी वाचा- “…त्या पाच वर्षाच्या मुलाचा काय दोष”, मुंबईच्या महापौरांचा प्रश्न
मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं असतानाच मालाडच्या मालवणीमध्ये रात्रीच्या सुमारास ही इमारत कोसळली. इमारत शेजारी असणाऱ्या घरांवर कोसळली असून अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. आज दुपारपर्यंत या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.