मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगर परिसरात गुरुवारी सायंकाळी म्हाडाच्या एका इमारतीचे छत अचानक कोसळले. यामध्ये तळ मजल्यावर राहणाऱ्या दोन वृद्ध इसमांचा मृत्यू झाला असून विक्रोळी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. कन्नमनगर परिसरातील रमाबाई उद्यानाजवळ म्हाडाची ४० क्रमांकाची इमारत असून ती ५० ते ६० वर्ष जुनी आहे. तीन मजल्याच्या या इमारतीत पूर्वी ४० ते ५० कुटुंबे वास्तव्यास होती. मात्र १४ वर्षांपूर्वी एका विकासकाने या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतल्याने अनेकांनी इतर ठिकाणी संसार थाटल. मात्र सोसायटीच्या वादामुळे अनेक वर्षांपासून इमारतीचे काम रखडले आहे.
इमारतीचे काम सुरूच होत नसल्याने पुन्हा दहा ते बारा कुटुंबे तेथे राहण्यासाठी आली होती. दरम्यान गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास अचानक या इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरील छताचा काही भाग पहिल्या मजल्यावर कोसळला. त्यानंतर पहिल्या मजलवरील छत तळ मजल्यावर कोसळले. शेजारी राहणाऱ्या नागरिकांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी ढिगारा बाजूला करून तळ मजल्यावर राहणारे शरद मशालकर (७५) आणि सुरेश म्हाडाळकर (७८) या दोघांना बाहेर काढून विक्रोळीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला.
हेही वाचा : आज सीएसएमटी ते दादर, वडाळा लोकल बंद
घटनेनंतर स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी घटनास्थळी भेट देत इमारतीमधील इतर कुटुंबियांना परिसरातील एका संक्रमण शिबिरात तात्पुरती राहण्याची सोय केली असल्याची माहिती दिली आहे. काही महिन्यांपूर्वी इमारतीचा वाद मिटून त्याची माहिती म्हाडाला देण्यात आली होती. मात्र म्हाडाने ना हरकत प्रमाणपत्र वेळीच न दिल्याने हा अपघात घडल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर सरकारने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. इमारतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडा मुंबई मंडळाने ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. पण पुनर्विकास रखडला होता. तो का रखडला होता याची चौकशी करू. मात्र सोसायटीच्या वादात पुनर्विकास रखडला होता,अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे.