मुंबई : जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असलेल्या फुलपाखराविषयी जाणून घेण्यासाठी, तसेच फुलपाखरांच्या संवर्धनाबाबत मुंबईकरांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने आयोजित केलेल्या फुलपाखरू महोत्सवाला शनिवारपासून चेंबूर येथील एन. जी. आचार्य उद्यानात सुरुवात झाली.

मुंबई महानगरपालिका आणि ‘विवान्त अनटेम्डअर्थ फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने चेंबूरमधील एन. जी. आचार्य उद्यानात (डायमंड गार्डन) भरविण्यात आलेल्या फुलपाखरू महोत्सवाची संकल्पना ‘फुलपाखरांचे संवर्धन आणि शहरी अधिवास’ या विषयावर बेतली आहे.

हेही वाचा – मुंबादेवीतील अत्याधुनिक रोबोटिक वाहनतळाच्या कामाला परवानगी द्यावी, मुंबई महापालिकेचे राज्य सरकारला साकडे

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी फुलपाखरांच्या चित्रप्रदर्शनाबरोबरच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. चित्रकला स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी फुलपाखरू संवर्धनासाठी सार्वजनिक प्रतिज्ञाही घेण्यात आली. महापालिका आयुक्त, प्रशासक भूषण गगराणी यांनी उपस्थितांना प्रतिज्ञा वाचून दाखवली.

उद्यानात फुलपाखरांची माहिती असलेली छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. तसेच विविध बचत गटांचे या ठिकाणी स्टॉलही होते. दरम्यान, परिसरातील रहिवाशांना या महोत्सवाची माहिती व्हावी आणि फुलपाखरांबाबत जनजागृती व्हावी, यासाठी शनिवारी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून फुलपाखरांच्या संवर्धनासाठी विविध संदेश देण्यात आले.

हेही वाचा – मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण, जयदीप आपटे याला उच्च न्यायालयाकडून जामीन

मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपआयुक्त विश्वास मोटे, सहाय्यक आयुक्त (एम पूर्व) अलका ससाणे, राज्य माहिती आयुक्त डॉ. प्रदीप व्यास, पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, ‘विवान्त अनटेम्डअर्थ फाउंडेशन’चे डॉ. संजीव शेवडे आदी उपस्थित होते. या दोन दिवसीय महोत्सवात फुलपाखरांना समर्पित असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मुलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Story img Loader