मुंबई: रस्त्यालगत झोपलेल्या एका श्वानाला सिमेंट मिक्सर वाहनाने चिरडल्याची घटना शनिवारी सायंकाळी भांडुप परिसरात घडली. याबाबत एका प्राणीप्रेमी महिलेने केलेल्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी सिमेंट मिक्सर चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नाहूर रेल्वे स्थानक परिसरातील रुद्राक्ष टॉवर या इमारतीजवळ शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. तेथे इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने त्या इमारतीच्या बांधकामासाठी सिमेंट मिक्सर वाहनांमधून माल आणला जात होता. यावेळी याठिकाणी रस्त्यालगत एक भटका श्वान झोपला होता. त्या श्वानाच्या अंगावरून सिमेंट मिक्सर वाहन गेल्याने यामध्ये श्वान गंभीर जखमी झाला. त्यावेळी परिसरातून प्राणीप्रेमी संघटनेची एक महिला जात होती.

रस्त्यालगत गंभीर अवस्थेत पडलेल्या श्वानाला पाहून तिने परिसरात विचारपूस केली असता सिमेंट मिक्सर वाहनाच्या धडकेत श्वान गंभीर जखमी झाल्याचे तिला समजले. त्यानुसार तिने तत्काळ रुग्णवाहिकेमधून या श्वानाला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत महिलेने भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सिमेंट मिक्सर वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Story img Loader