सचिन धानजी, मुंबई
मुंबईत १५ ते २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या आणि सध्या भेगाळलेल्या स्थितीत असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवर आता डांबराची मलमपट्टी केली जाणार आहे. मुंबईत आतापर्यंत तब्बल ७००हून अधिक किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मात्र, १५-२० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या रस्त्यांची आता पुरती दुरवस्था झाली आहे. भेगाळलेल्या आणि खड्डे पडलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी डांबराचा वापर केला जात आहे.
मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामाला १९८९ पासून सुरुवात करण्यात आली. शहरातील १९४१ किलोमीटरपैकी सुमारे ७०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. उर्वरित रस्ते अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंगचे, डांबरी आहेत. आता अनेक जुन्या सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांचा पृष्ठभाग वाहतुकीच्या अतिभारामुळे खराब झाला असून बहुतेक रस्त्यांना तडेही गेले आहेत.
काँक्रीटच्या रस्त्यांवर पडलेले तडे बुजवण्यासाठी यापूर्वी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात येत होती. या भेगा सिमेंट काँक्रीटनेच बुजवले जात होत्या. यापुढे रस्ते डांबराने सुस्थितीत आणले जातील. पहिला प्रयोग रेसकोर्ससमोर केला गेला आहे. आणखीही काही रस्त्यांवर हा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
रेसकोर्सपासून सुरुवात
मुंबईत जे सिमेंट-काँक्रीटचे रस्ते खराब झाले आहेत, त्यांचा पाया मजबूत आहे. डांबराचा थर चढवल्यास ते सुस्थितीत येतात. हाजी अली रेसकोर्सच्या रस्त्यावर बिटुमिनचा १२ मि.मी.चा थर चढवण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास ज्या रस्त्यांचा सिमेंट काँक्रीटचा पृष्ठभाग खराब झाला आहे, त्यावर अशा प्रकारचा डांबराचा थर देण्यात येईल, असे रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. ज्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवर चर खोदण्यात आलेले आहेत, अशा रस्त्यांवर याचा वापर केला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.