मुंबई : मुंबई सेंट्रल येथील बीआयटी चाळींचा पुनर्विकास बीडीडी चाळींच्या धर्तीवर करावा व त्याकरीता मुंबई महानगरपालिकेने धोरण निश्चित करून निविदा काढाव्या या मागणीसाठी चाळीतील रहिवासी एकवटले असून त्यांनी विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.
मुंबई सेंट्रल येथील बीआयटीच्या १९ इमारतींचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न २००६ सालापासून सुरू आहे. मात्र त्यात आतापर्यंत अनेक वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे गेली कित्येक वर्षे या चाळींचा पुनर्विकास रखडला आहे. या चाळ समूहात रहिवाशांच्या दोन संघटना असून त्यापैकी बी आय टी चाळ सेवा संघा या रहिवासी संघटनेने नुकतेच आंदोलन केले व निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.
मुंबईतील सर्वच बीआयटी चाळींना १०० वर्षे पूर्ण झालेली असल्याने बीडीडी चाळींच्या पुनर्विकास धोरणानुसारच बीआयटी चाळींचा पुनर्विकास करावा अशी मागणी चाळवासियांची आहे. जुने संमतीपत्र दाखवून रेटण्यात येत असलेल्या प्रस्तावाला या संघटनेने विरोध केला आहे. पालिका प्रशासनाने स्वतः निविदा मागवून विकासकाची निवड करावी अशी मागणी चाळीतील रहिवासी गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहेत. मात्र पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे चाळकऱ्यांनी हा पवित्रा घेतला आहे.
© The Indian Express (P) Ltd