मुंबई : मध्य रेल्वेवरील ठाणे – कळव्यादरम्यान गुरुवारी मध्यरात्रीपासून पुढील ६३ तास ब्लाॅक घेण्यात आला आहे. या कामामुळे शुक्रवारी १६१ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून इतर लोकल विलंबाने धावत होत्या. परिणामी, लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. लेटलतीफ कारभार आणि गर्दी टाळण्यासाठी बहुतांश नोकरदारांनी घरूनच कार्यालयीन काम करणे पसंत केले. अनेकांनी महा मेगा ब्लाॅकचा धसका घेऊन कार्यालयाला सुट्टी घेतल्याचेही निदर्शनास आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकल सेवा शुक्रवारी पहाटेपासून विलंबाने धावत होती. परिणामी अनेक लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. नेहमीपेक्षा पाऊण ते एक तास उशिराने लोकल धावत होत्या. यावर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा वापर करण्याचे आणि घरून काम करण्याचे आवाहन केले. त्यामुळे अनेक आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून कार्यालयीन काम करण्याचा पर्याय उपलब्ध केला.

हेही वाचा : मुंबई: विरार – वैतरणादरम्यान गर्डर बदलण्यासाठी ब्लॉक

सीएसएमटी, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण येथील स्थानकांत सकाळच्या वेळी प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यामुळे कार्यालयीन वेळेत सकाळी लोकल भरगच्च भरली होती. मात्र त्यानंतर लोकलमधील प्रवाशांची संख्या रोडावली. जीवघेणा प्रवास केल्यानंतर प्रवाशांनी वाहतुकीचा अन्य पर्याय निवडण्यास सुरुवात केली. तसेच खासगी कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी खासगी वाहने आरक्षित करून प्रवास केला.

मध्य रेल्वेवरील महा मेगा ब्लाॅकमुळे कंपनीने कार्यालयीन काम घरून करण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे, असे एका खासगी आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मध्य रेल्वेवरील ब्लाॅकमुळे सरसकट कार्यालयीन काम घरून करण्याचा पर्याय दिलेला नाही. मध्य रेल्वेवर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. अंधेरी, बेलापूर येथील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही घरून काम करण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय माल वाहतूक कुरिअर सेवेतील सामान्य प्रशासन विभागाने दिली.

हेही वाचा : 63 Hours Long Mega Block: मध्य रेल्वेवर आज महा मेगा ब्लाॅक; शनिवारी सुट्टीकालीन लोकल वेळापत्रक जाहीर, ५३४ लोकल फेऱ्या होणार रद्द

आयटी कंपन्याकडून टॅक्सीची व्यवस्था करण्यात येते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आलेली नाही. लांबून येणाऱ्यांना प्रवाशांना टॅक्सीने येण्याची मुभा दिली आहे.

पर्यटन मंत्रालयाच्या इंडिया टुरिझम विभागातर्फे विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना भारतातील पर्यटनस्थळांची आणि तेथील सोयी – सुविधांची माहिती देण्यात येते. इंडिया टुरिझमचे कार्यालय नरिमन पॉईंट येथे आहे. मध्य रेल्वेने शुक्रवारपासून तीन दिवस घेतलेल्या जम्बो ब्लॉकच्या धर्तीवर या कार्यालयाने मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर राहणाऱ्या त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. मात्र त्याचवेळी पश्चिम रेल्वे मार्गावर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवण्यात आले आहे. कार्यालयात येणारे व घरातून काम करणारे अधिकारी व कर्मचारी एकमेकांशी समन्वय साधून काम करणार असल्याची माहिती या कार्यालयातून देण्यात आली. साधारणपणे २५ टक्के कर्मचारी घरून काम करीत आहेत.

वैद्यकीय क्षेत्र वगळता अनेक आयटी क्षेत्रातील खाजगी कंपन्यानी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून कार्यालयीन काम करण्याची मुभा दिली आहे. हा मेगाब्लॉक गुरुवारी मध्यरात्रीपासून रविवारपर्यंत असल्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी अनेक कंपन्यांनी लॅपटॉप आणि अन्य आवश्यक उपकरणे घरी घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे. तसेच काही कंपन्यांनी गुरुवारी रात्रीपासून कार्यालयाजवळ कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था केली आहे.

हेही वाचा : मुंबई: ब्लाॅक कालावधीत टप्पा वाहतूक

मध्य रेल्वेने ६३ तासांचा जम्बो ब्लॉक जाहीर केल्यामुळे शुक्रवार, ३१ मे रोजी आयटी क्षेत्रातील खासगी कंपनीनी अभियंत्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. मी डोंबिवली येथे राहत असून माझ कार्यालय बीकेसीत आहे. त्यामुळे मला कुर्ला स्थानकावर उतरावे लागते. त्यामुळे जम्बो ब्लॉक कालावधीत मला घरून काम करण्याची मुभा मिळाली आहे.

सुदर्शन वळंजू ( आय टी अभयंता)

मी एका प्रतिष्ठित कंपनीच्या सेल्स आणि मार्केटिंग विभागात काम करतो. शुक्रवारपासून मेगा ब्लॉक असल्यामुळे मला घरून काम करण्यास परवानगी मिळाली आहे. मी ठाणे येथे राहतो. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस ही मुभा आम्हाला देण्यात आली आहे.

श्रेयस तांबे ( सेल्स आणि मार्केटिंग)

मी मार्केटिंग क्षेत्रात काम करीत आहे. माझ्या कंपनीने गुरुवारी रात्रीपासून शनिवारपर्यंत कार्यालयात राहण्याची सोय केली असून खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी आणि झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेकदा कामाचा भार वाढल्यावर आम्हाला कार्यालयात थांबावे लागते. त्यामुळे आम्हाला कंपनीतर्फे अशा सुविधा मिळत असतात.

नितेश आगाशे (मार्केटिंग)
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai central railway maha mega block employees like to do work from home mumbai print news css