मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या मुंबई सेंट्रल बस स्थानक परिसराच्या कॉक्रीटीकरण करण्याचे काम २३ डिसेंबरपासून सुरू होत असून, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई सेंट्रल बसस्थानकातून सुटणाऱ्या बाहेरील आगाराच्या बसच्या फेऱ्या २३ डिसेंबरपासून टप्प्याटप्प्याने पुढील दोन महिन्यासाठी परळ, दादर व कुर्ला नेहरूनगर बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत. दरम्यान मुंबई आगाराच्या फेऱ्या याच बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत.
हेही वाचा : न्यायदालनातील स्क्रीनवर लागली अश्लील चित्रफीत, संगणक प्रणाली हॅक केल्याचा संशय
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) सहकार्याने एसटीच्या राज्यभरातील १८३ बसस्थानकांच्या परिसराचे कॉक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एमआयडीसी त्यासाठी सुमारे ६०० कोटी रुपये खर्च करणार आहेत. अनेक बसस्थानक परिसरातील काम सध्या प्रगतीपथावर असून त्याअंतर्गत लवकरच मुंबई सेंट्रल बसस्थानक परिसराच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. सुमारे १,९०० चौरस मीटर इतक्या परिसराचे कॉक्रीटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी १ कोटी ६४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर बस स्थानक परिसर खड्डेमय होणे, पाणी साचणे, धुळ उडणे अशा समस्या दूर होतील. दरम्यान, राज्यभरातून विविध आगारांच्या सुमारे १५५ बस दिवसभरात मुंबई सेंट्रल येथे येतात. त्यातून शकडो प्रवासी मुंबई सेंट्रल बसस्थानक परिसरामध्ये उतरतात. काँक्रीटीकरणाच्या कामामुळे त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी या फेऱ्या जवळच्या परळ, दादर व कुर्ला नेहरूनगर बस स्थानकांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे या सर्व फेऱ्या मुंबई सेंट्रल बसस्थानकातून सुरू राहतील, अशी माहिती एसटी महामंडळातर्फे देण्यात आली.