मुंबई : हॉटेल मॅनेजमेंट, बीएड आणि एमसीए या विषयांसाठीच्या प्रवेश परीक्षेसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सराव चाचणी (मॉक टेस्ट) उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बीएड (सामान्य), बीएड (इलेक्ट) आणि एमसीए या विषयांच्या परीक्षांसाठीची प्रवेशपत्र राज्य संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी प्रवेशपत्राची प्रत संकेतस्थळावरून काढून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेसंदर्भात असलेल्या शंका व भीती दूर व्हावी यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून यंदा सर्व अभ्यासक्रमांसाठी सराव चाचणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून गुरूवारी त्यांच्या संकेतस्थळावर बी.एचएमसीटी, एम.एचएमसीटी (हॉटेल मॅनेजमेंट), एमसीए, बीएड (सामान्य) आणि बीएड (इलेक्ट) या अभ्यासक्रमांसाठी सराव चाचणीची लिंक उपलब्ध करून दिली आहे. पुढील आठवड्यात या विषयांच्या परीक्षा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सराव करण्यास मदत हाेणार आहे.
सीईटी कक्षाने आपल्या https://cetcell.mahacet.org/wp-content/uploads/2023/12/Mocktest_links-1.pdf या संकेतस्थळावर या चाचण्या विषयनिहाय उपलब्ध करून दिल्या आहेत. या पैकी एमसीए अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २३ मार्च रोजी नियोजित आहे. बीएड (सामान्य) आणि बीएड (इलेक्ट) या दोन्ही अभ्यासक्रमाच्या परीक्षा २४ मार्च रोजी होणार आहेत. त्याशिवाय बी. एचएमसीटी-एम. एचएमसीटी (एकात्मिक) ही परीक्षा २८ मार्च रोजी आणि एम. एचएमसीटीची परीक्षा २७ मार्च रोजी होणार आहे.
हेही वाचा
बीएड आणि एमसीएसाठी प्रवेशपत्र उपलब्ध
बीएड (सामान्य), बीएड (इलेक्ट) आणि एमसीए या विषयांच्या परीक्षांसाठीची प्रवेशपत्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावरून घ्यावे, असे आवाहनही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून करण्यात आले आहे.
सराव चाचणीसाठी मोजावे लागणार पैसे
व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा अंदाज यावा, त्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी व्हावा यासाठी सराव चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली असली तरी यासाठी विद्यार्थ्यांना ५०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांनी ५०० रुपये शुल्क भरल्यानंतर त्यांना पाच परीक्षा देता येणार आहेत.