एल्फिन्स्टन-परळ पुलावरील चेंगराचेंगरीने मध्य प्रदेशच्या चंदन गणेश सिंह याचा बळी घेतला. चंदन घरातील एकटा कमावता व्यक्ती असून, कर्त्या पुरुषाच्या मृत्यूमुळे चंदनच्या पत्नीसमोर आता उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एल्फिन्स्टन-परळ येथील पुलावर शुक्रवारी सकाळी चेंगराचेंगरीत २२ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतदेह सध्या केईएम रुग्णालयात असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले जात आहे. या चेंगराचेंगरीत चंदन सिंहचा मृत्यू झाला असून, चंदन हा मूळचा मध्य प्रदेशचा आहे. चंदन त्याची पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलासह बदलापूरमध्ये राहत होता. चंदन एल्फिन्स्टन येथे एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला आहे. शुक्रवारी सकाळी चंदन नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी एल्फिन्स्टन येथे आला. चेंगराचेंगरीत त्याचा मृत्यू झाला असून या घटनेची माहिती मिळताच त्याच्या मामांनी रुग्णालयात धाव घेतली.
चंदनचे आई-वडीलही मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून, यानंतरच त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. चंदनच्या अकाली मृत्यूमुळे सिंह कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला.
चंदनप्रमाणेच कुर्ला येथे राहणारी प्रियांका पासलकर (वय २३) ही वरळीत कामाला होती. कामावर जात असताना काळाने तिच्यावर घाला घातला. प्रियांका सकाळी कामावर जाण्यासाठी घरुन निघाली. यानंतर तिच्या वडिलांना मोबाईलवर फोन आला. केईएममध्ये प्रियांकाचा मृतदेह बघून तिच्या वडिलांना मानसिक धक्काच बसला.
मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@loksatta.com