मुंबई : विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालून मुंबई प्रदूषणमुक्त, खड्डेमुक्त आणि झोपडपट्टीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून त्या दृष्टीने मुंबईत कामे सुरू आहेत. मुंबई पालिकेच्या माध्यमातून मुंबईमध्ये दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यातून मुंबईला नवा आकार येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मुंबई महानगरपालिकेच्या निरनिराळ्या प्रकल्पांमधील अभियंत्यांचे मोलाचे योगदान, प्रकल्पांना अभियांत्रिकी जोड मिळावी यासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न ‘लोकसत्ता’ने ‘तंत्र-श्रीमंत’ कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मुंबई पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजीत बांगर, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे सुरू आहेत. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरत आहेत. त्यामुळे मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी काँक्रीटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. आतापर्यंत ४०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. पावसाळ्यानंतर पुन्हा रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामेही सुरू करण्यात आली आहेत. त्याचबरोबर पाणीपुरवठा, मलनिस्सारण, स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट, सुशोभीकरण आदी विविध कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहेत. एकूणच मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
मुंबई आणि उपनगरांतील वाहतुकीला गती देण्यासाठी धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. सागरी किनारा रस्ता प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईमधून पश्चिम उपनगरामध्ये पोहोचता येणार आहे, असेही ते म्हणाले.
मुंबई स्वच्छ करणारे सफाई कामगार अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सेवा निवासस्थानांमध्ये वास्तव्यास आहेत. सेवा निवासस्थानाच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. तसेच तेथे अस्वच्छता आहे. त्यामुळे सफाई कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याचे प्रश्नही निर्माण होतात. सेवा निवासस्थानांतील प्रतिकूल परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून ‘आश्रय’ योजनेच्या माध्यमातून सफाई कामगारांच्या सेवा निवासस्थानांचा विकास करण्यात येणार आहे. सफाई कामगारांसाठी नऊ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. मुंबईकरांबरोबरच त्यांचेही जीवनमान उंचाविण्यासाठी भविष्यात सेवा निवासस्थानांमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
मुंबईच्या अभियांत्रिकी इतिहासावर दृष्टिक्षेप
‘तंत्र श्रीमंत’ कॉफी टेबल बुकमध्ये मुंबईच्या अभियांत्रिकी इतिहासावर दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे. पुरातन वारसा वास्तू यादीत समाविष्ट ऐतिहासिक इमारतींचे जतन, धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प, पूर्व – पश्चिम परिसर जोडमारा गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्प, दळणवळणासाठी उभारण्यात आलेले पूल, पाणीपुरवठा, मलजलाचा पुनर्वापर, पूरनियंत्रण, ब्रिमस्टोवॅड प्रकल्प, पर्जन्य जलवाहिन्या, आरोग्य सेवा, शिक्षण विभागाचे प्रकल्प आदींना अभियंत्यांनी दिलेली अभियांत्रिकी कामांची जोड याबाबत विस्तृत माहिती ‘तंत्र श्रीमंत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.