मुंबई : चिंचपोकळी परिसरातील जिवराज रामजी बोरीचा मार्गावरील अतिक्रमण पालिकेच्या जी दक्षिण विभागाने हटवले आहे. पालिकेच्या विभाग कार्यालयाने मोठी मोहीम हातात घेऊन तब्बल १५० झोपड्या व अतिक्रमणे हटवली आहेत.
लोअर परळ, महालक्ष्मी आणि चिंचपोकळी या स्थानकांच्या मध्यभागी असलेला जे आर बोरिचा मार्ग हा जी दक्षिण विभागाच्या हद्दीत येतो. या मार्गावर दोन्ही बाजूला पदपथावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होते. पालिका विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांनी हे अतिक्रमण हटवण्याची मोठी मोहीम हाती घेतली. देखभाल विभागाचे अभियंता राजेश यादव यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या कारवाईत सुमारे दीडशे झोपड्या, अतिक्रमणे हटवण्यात आली.
ही कारवाई एन. एम. जोशी पोलीस ठाण्याच्या सहकार्याने करण्यात आली. या वेळी तब्ब्ल ६० पुरुष व ४० महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच पालिकेचे २० अभियंते, ५० कामगार या मोहिमेत होते. दोन जेसीबी यंत्रणांच्या मदतीने अतिक्रमण काढण्यात आले.
दोन्ही बाजूंच्या ३०० मीटर लांबीच्या पदपथावरील अतिक्रमण यावेळी हटवण्यात आले. ज्यामुळे बोरीचा मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. हा रस्ता सिताराम मिल महापालिका शाळेकडे जात असल्याने विद्यार्थ्यांना, पालकांना आणि पादचाऱ्यांना या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.