मुंबई : राज्यात रेल्वेच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी १ लाख ७३ हजार कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. यात प्रामुख्याने उपनगरीय रेल्वेच्या दृष्टीने कवच-५ या नव्या यंत्रणेने दोन लोकलमधील अंतर कमी होण्यास मदत होईल. सध्या हे अंतर १८० सेकंद आहे. हा वेळ ३० टक्के कमी झाल्यास तितक्याच नव्या लोकल सेवेत येतील असा विश्वास रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला. तसेच मुंबईसाठी नवीन २३८ वातानुकूलित गाड्यांची निर्मिती अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी नमूद केले.
कल्याण ते बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका तसेच कल्याण ते आसनगाव चौथ्या मार्गिकेचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण ,याशिवाय गोंदिया ते बल्लारशाह या विदर्भ-मराठवाड्यातील २४० किमीच्या दुहेरीकरणाच्या प्रकल्पासाठी ४८१९ कोटी रुपये मंजूर केल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिली. राज्यात सध्या सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पांबाब वैष्णव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी २३ हजार ७०० कोटींची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या गर्दीवर तोडगा, त्याचप्रमाणे अपघात कमी व्हावेत यासाठी येथील पायाभूत सुविधांवर भर देण्यात येईल. कवच-५ या यंत्रणेने वेग आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. डिसेंबर अखेरीस ही यंत्रणा कार्यरत होईल असे वैष्णव यांनी स्पष्ट केले.
कोकण रेल्वेमुळे मर्यादा
कोकण रेल्वे हे मंडळ असल्याने दुहेरीकरण किंवा अन्य कामे करण्यात अनेक मर्यादा येतात. यामुळेच कोकण रेल्वे हे मंडळ भारतीय रेल्वेत समाविष्ट करण्यात यावे अशी विनंती महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांनी केंद्र सरकारला केली आहे. कोकण रेल्वे हे नाव कायम ठेवण्यात यावे, अशीही विनंती करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पर्यटनाला चालना
रेल्वे मंत्रालयाच्या माध्यामतून लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सुरू होणार आहे. यामध्ये शिवरायांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले, सांस्कृतिक स्थळे यांचा समावेश असलेला १० दिवसांचे पर्यटन कार्यक्रम आयोजित केला जाईल. या उपक्रमामुळे महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पावसाळ्यात रेल्वे बंद पडू नये उपाय
पावसाळ्यात विशेषत: मध्य रेल्वे मार्गावरील लोकल बंद होतात किंवा विलंबाने सुरू असतात. यासाठी पॉइंट मशीन केले जातील. दीड फूट पाणी असले तरी रेल्वे सुरू राहील अशी यंत्रणा उभारली जाईल. त्याचप्रमाणे रेल्वे मार्गावरील पाण्याचा वेगाने निचरा व्हावा यासाठी रेल्वे मार्गांच्या दोन्ही बाजूंनी पाणी जाण्यासाठी भूयारी गटारे उभारण्यात येत असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
या स्थानकांचे नुतनीकरण
नूतनीकरण करण्यात येणाऱ्या रेल्वे स्थानकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (मध्य व पश्चिम), परळ, अंधेरी, लोकमान्य टिळक टर्मिनस, डोंबिवली पुणे, नाशिक रोड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, अमरावती, भुसावळ, अक्कलकोट रोड, दौंड, इगतपुरी, चांदा फोर्ट, मालाड, चिंचवड या स्थानकांचा समावेश आहे.
कल्याण ते बदलापूर अतिरिक्त मार्गिका
कल्याण ते बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका, कल्याण – आसनगाव दरम्यान चौथ्या मार्गिकेचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. हार्बर रेल्वेला गोरेगावहून आता थेट बोरिवलीपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बोरिवली ते विरारच्या सहाव्या मार्गिकेचे काम, विरार ते डहाणू रोड, पनवेल कर्जत कॉरिडॉर, ऐरोली-कळवा एलिव्हेटेड कॉरिडॉर आदी कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली.
गर्दीला पर्याय म्हणून मुंबईतील कार्यालयांची वेळ बदलण्याबाबत विचार सुरू आहे. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करता येतो का, याचा आढावा घेण्यात येत आहे. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री