मुंबई : एकीकडे राजधानी दिल्लीतील वायू प्रदुषणाबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे मुंबईमधील प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी मुंबईमधील वाढत्या हवा प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. सध्या समाजमाध्यमावर शहरातील काही प्रदूषित भागांची छायाचित्र टाकून ‘व्हॉट वी आर ब्रिदींग’ असा सवाल मुंबईकर करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील अनेक दिवस मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली आहे. दोन दिवसांपूर्वी संपूर्ण मुंबईतील हवेची ‘वाईट’ श्रेणीत नोंद झाली होती. तर काही भागात दररोज हवा ‘वाईट’ श्रेणीत नोंदली जात आहे. यावर सध्या समाजमाध्यमावर अनेकजण व्यक्त होत आहेत. मुंबईतील हवा फारशी चांगली नाही. यामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे ट्विट अनेक नागरिकांनी ‘एक्स’वर केले आहे. याला जबाबदार कोण, आपल्या शहराला काय झाले आहे, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.

हेही वाचा : अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळाली, २७ हजार कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा

दरम्यान, या हवेमुळे अनेकांना श्वसनाचे त्रास होऊ लागला आहे. घसा खवखवणे, सर्दी, ताप ही प्रमुख लक्षणे जाणवत असून सततच्या प्रदूषित हवेमुळे हृदयविकार असलेल्यांना श्वसनास त्रास होऊ शकतो. वायू प्रदूषणाचा सर्वाधिक धोका पाच वर्षांखालील मुले आणि वृद्ध व्यक्तींना होण्याची शक्यता आहे. याचबरोबर प्रदूषित हवेमुळे गर्भावर परिणामही होऊ शकतो. दरम्यान, गेले अनेक दिवस मुंबईतील ठराविक भागातील हवा ‘वाईट’ श्रेणीत नोंदली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने वांद्रे – कुर्ला संकुल, भायखळा, शिवडी, कुलाबा, शिवाजीनगर या परिसरांचा समावेश आहे.

हवा ‘वाईट’… वांद्रे – कुर्ला संकुल, भायखळा, शिवडी, कुलाबा, शिवाजीनगर

मुंबईतील वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार बळावले आहेत. खोकला, घशात जळजळ होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. श्वसनाचा त्रास असलेल्यांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा.

डॉ. अर्चना कुडाळकर, श्वसनविकार तज्ज्ञ

हेही वाचा : मुंबई विद्यापीठातर्फे पुनर्मूल्यांकनासाठी दरवर्षी लाखोंचा खर्च

प्रदूषित हवेचे दुष्परिणाम

● सतत खोकला

● डोळे, नाक, घशात जळजळ

● श्वसननलिकेचे आजार

काय काळजी घ्यावी

● बाहेर जाताना मास्कचा वापर करावा

● वृद्ध, लहान मुलांची काळजी अधिक घ्यावी

● सर्दी, खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai city air pollution social media what we are breathing trends on x twitter mumbai print news css