मुंबई : शहर आणि उपनगरात मंगळवारी प्रकर्षाने उकाडा जाणवत होता. यामुळे दुपारी रस्त्यावरील वर्दळ काहीशी कमी होती. एखाद्या वाळवंटी प्रदेशात राहिल्याप्रमाणे सातत्याने उष्ण वारे नागरिकांनी अनुभवले. तसेच कोरड्या वाऱ्यांनी दुपारच्या वेळी प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना अक्षरश: चटके बसत होते. आर्द्रतेमुळे येणारा घाम परवडला, पण कोरड्या हवेमध्ये भाजून निघाल्याची जाणीव असह्य असल्याची भावना अनेक मुंबईकरांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात मंगळवारीही उन्हाचा तडाखा जाणवला. दिवसभरात शहरात उन्हाळ्याप्रमाणेच कडक ऊन पडले होते. सकाळपासून रात्रीपर्यंत सतत जाणवणारा उकाडा. तसेच सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत बसणारे उन्हाचे चटके आणि अंगाची लाहीलाही यामुळे मुंबईकर सध्या घामाच्या धारांचा अनुभव घेत आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारचे ऊन अधिक तापदायक होते. उष्ण वारा आणि तप्त ऊन यामुळे बैचेन व्हायला झाले. सोमवारी रात्रीही उकाडा होता. सोमवारी सूर्य आग ओकत असल्याने सकाळी ११ वाजल्यानंतर रस्त्यावरील रहदारी कमी झाल्याचे चित्र होते. सिग्नलला थांबणारे वाहनचालक सावलीचा आडोसा शोधत होते. उन्हामुळे होणारी लाहीलाही काहीशी सुसह्य होण्यासाठी अनेकांनी रसवंतीगृह, शहाळे कलिंगड विक्रेते, तसेच सरबतांच्या गांड्यांवर गर्दी केली होती.

दरम्यान, वाढणाऱ्या उष्म्यामुळे आणि अचानक बदलेल्या तापमानामुळे आजारी नागरिकांची संख्याही वाढत आहे. सध्याचे तापमान एप्रिल ते मे या कालावधीतील तापमानाप्रमाणे आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी तापमान वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, यंदा फेब्रुवारीच्या मध्यावरच उकाडा जाणवू लागल्याने यंदाचा उन्हाळा कसा असणार, याची चिंता मुंबईकरांना सतावू लागली आहे.

उष्णतेचा त्रास झाल्यास काय करावे

संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी किंवा सावलीमध्ये तातडीने हलवावे.

शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा.

पुरेसे पाणी प्या, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ द्या.

उन्हाळ्यात स्वत:चे संरक्षण कसे कराल

ऊन जास्त असल्यास भरपूर पाणी पिणे फार महत्त्वाचे आहे.

उन्हाळ्यात शरीराला ताण देणारे व्यायाम अजिबात करू नयेत.

हलके फिकट रंगाचे आणि सैलसर कपडे घालावे. जेव्हा तापमान जास्त असेल तेव्हा थंड ठिकाणी, सावलीत बसावे.