मुंबई : वांद्रे, अंधेरी, जुहू, वरळी यासह अनेक भागात रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे रखडली आहेत, परिणामी नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून या गोष्टी थांबायला हव्यात. गेल्या दोन वर्षांत रस्ते कामातील नियोजनाअभावी शहराची दुर्दशा झाली असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी केला. तसेच, गणपतराव कदम मार्ग आणि आर्थर रोडवरील पुलाचे बांधकाम पूर्ण होत नाही, तोपर्यंत एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम करू नये, अशी मागणीही त्यांनी केली.

महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांत रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी कामे सुरु आहेत. येत्या ३१ मे पूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार मुंबईत रस्ते कामांना गती देण्यात आली आहे, मात्र अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे संथगतीने सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, वरळी मतदारसंघात सुरु असलेल्या रस्ते कामांची आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी पाहणी केली. दूरदर्शन येथील रस्ते, लोअर परळ, गणपतराव कदम मार्ग, वीर संताजी लेन, मेटल बॉक्स लेन, डी. एन मार्ग आदी भागांमधील रस्त्यांची पाहणी करत त्यांनी महापालिकेच्या काँक्रिटीकरणाबाबत नाराजी व्यक्त केली.

महानगरपालिकेने रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची सर्व तयारी केली होती, मात्र महापालिकेच्या आड असलेली मंडळी मुंबई लुटायला बसली आहेत, असा थेट आरोप करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. १५ जानेवारी २०२३ रोजी पत्रकार परिषद घेऊन रस्त्यांचा घोटाळा जनतेसमोर आणला होता. २०२३, २०२४ च्या रस्ते कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचे सुरुवातीपासून सांगत आहे. महानगरपालिकेच्या रस्ते विभागातील अधिकारी प्रामाणिकपणे काम करत असतात, मात्र अनेकदा कंत्राटदार कामात हलगर्जीपणा करतात, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, नालेसफाईतील दिरंगाई, महापालिका अधिकाऱ्यांच्या एमएमआरडीए, रेल्वे प्रशासनासोबत बैठका झालेल्या नाहीत. मुंबईवर प्रेम नसलेले लोक सत्तेत बसल्याने या समस्या निर्माण झाल्या असल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी रस्त्यांशी संबंधित तीन मागण्या केल्या. रस्ते कामांसाठी कंत्राटदारांना १० टक्के आगाऊ रक्कम दिली आहे का, याची तपासणी करावी, रस्त्यांची कामे अर्धवट सोडून पळून गेलेल्या तसेच संथगतीने कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई झाली आहे का, याची चौकशी करावी आणि कमी रुंदीच्या गल्ल्यांचे काँक्रिटीकरण करू नये, या तीन मागण्या ठाकरे यांनी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केल्या.