(
मुंबई : श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. त्याकरीता पालिका प्रशासनाने मुंबईकरांकडून लेखी सूचना मागवल्या असून २३ जानेवारीपर्यंत सूचना पाठवता येणार आहेत. पालिकेची मुदत संपल्यानंतरचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पासाठी लोकसहभाग असावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मुंबईकरांकडून सूचना मागवल्या आहेत. मात्र अर्थसंकल्प सादर करण्यास अवघे पंधरा दिवस उरलेले असताना पालिका प्रशासनाने हे आवाहन केले आहे. मुंबईकरांनी आपल्या सूचना पाठवाव्यात, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. पालिकेची मुदत संपल्यामुळे नगरसेवकांच्या सूचनांशिवाय तयार करण्यात येणारा हा दुसरा अर्थसंकल्प असून त्यासाठी या सूचना मागवण्यात आल्या आहेत.
हेही वाचा >>> पश्चिम रेल्वेवर पहिले ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पालिकेचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. मुंबई महापालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प ५२,६१९.०७ कोटी रुपयांचा होता. एका राज्याच्या अर्थसंकल्पाइतके या अर्थसंकल्पाचे आकारमान असते. मार्च २०२२ मध्ये पालिकेची मुदत संपल्यापासून सध्या मुंबई महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकीय राजवटीत सादर होणारा हा अर्थसंकल्प असल्यामुळे त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प विशेष असणार आहे. पालिकेच्या घटलेल्या मुदतठेवी, वाढलेले खर्च, राजकीय आरोप प्रत्यारोप यांमुळे या अर्थसंकल्पाला महत्त्व आहे. मुंबई महानगरपालिकेत सध्या प्रशासक नियुक्त करण्यात आले असून लोकप्रतिनिधी नसल्याने सन २०२४-२५ चा अर्थसंकल्पही गेल्यावर्षीप्रमाणे केवळ प्रशासन स्तरावर सादर केला जाणार आहे. सन २०२४-२५ या वर्षाकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्याचे काम सुरु आहे. मुंबई महानगरपालिकेला अर्थसंकल्पीय अंदाज दिनांक ५ फेब्रुवारी, २०२४ पूर्वी सादर करावे लागतात. त्यामुळे २३ जानेवारीपर्यंत नागरिकांना आपल्या सूचना सादर करता येणार आहेत.
येथे सूचना पाठवाव्यात
ज्यांना अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने काही सूचना करावयाच्या असतील तर त्यांनी दिनांक २३ जानेवारी, २०२४ पर्यंत ई-मेल आयडी bmcbudget.suggestion@mcgm.gov.in यावर सदर सूचना पाठवाव्यात. तसेच ज्या नागरिकांना लेखी सूचना पाठवावयाच्या असतील तर त्यांनी दिनांक २३ जानेवारी, २०२४ पर्यंत खालील पत्यावर पाठवाव्यात. पत्ताः
प्रमुख लेखापाल (वित्त) यांचे कार्यालय, चौथा मजला, विस्तारीत इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महानगरपालिका मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०० ००१ या पत्त्यावर पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.