पहिल्या आठवडय़ातील पावसातच शहरातील रस्त्यांवरील खडी वाहून गेल्याने सर्वत्र खड्डेच खड्डे

पावसाळ्यापूर्वी डांबरमिश्रित खडी टाकून बुजविलेल्या रस्त्यांवरील खड्डे ही तात्पुरती मलमपट्टीच ठरल्याचे अवघ्या आठवडाभराच्या पावसाने दाखवून दिले आहे. खड्डय़ात टाकलेल्या डांबरमिश्रित खडीवर आवश्यक तेवढा दाब देऊन सपाटीकरण करण्यात आले नाही. या हलगर्जीपणामुळे पहिल्याच पावसात डांबरमिश्रित खडी वाहून गेली असून पुन्हा खड्डे उघडे पडले आहेत. मुख्य रस्त्यांबरोबरच गल्लीबोळातल्या रस्त्यांचीही पावसाळ्यात चाळण झाल्याने मोठमोठय़ा खड्डय़ांमधून वाहन हाकताना चालकांची अवस्था केविलवाणी होते आहे. त्यात अनेक चौकांमधील पेव्हरब्लॉक उखडले गेले असून वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे.

गेल्या आठवडय़ात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर मुंबईकरांची उन्हाच्या काहिलीतून मुक्तता झाली; परंतु आतापर्यंत झालेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागांतील रस्त्यांची चाळण होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी पदपथांवर बसवलेले पेव्हरब्लॉक उखडले गेले असून मुसळधार पावसात पाणी साचल्यामुळे पदपथावरील खड्डय़ांचा अंदाज येत असून अनेकांना ठेचकाळत चालावे लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले होते. हे खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने सात परिमंडळांमध्ये सात कंत्राटदारांची नियुक्ती केली असून या सर्वाना मिळून ४७ कोटी रुपयांचे कंत्राट दिले. तसेच पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या; परंतु कंत्राटदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने या सात कंत्राटदारांनाच पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजविण्याचे काम देण्यात आले. या कंत्राटदारांना पावसाळापूर्व आणि पावसाळ्यात पडणारे खड्डे ४७ कोटी रुपयांमध्ये बुजवावे लागणार आहेत.

मुंबईतील अनेक मोठय़ा चौकांमध्ये आजही पेव्हरब्लॉक बसविले आहेत. पावसात पाणी तुंबल्याने त्यातील काही पेव्हरब्लॉक उखडले गेले आहेत. परिणामी, वाहनांना कसरत करीत चौकांमधून गाडी हाकावी लागत आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावू लागला आहे.

अर्धवट काम, अपघातांत वाढ

पालिकेच्या विभाग कार्यालयांतील कामगारही पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्याचे काम करतात. तसेच प्रशासनाने नेमलेल्या कंत्राटदारांनीही मुंबईतील अनेक ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम केले. डांबरमिश्रित खडी टाकून खड्डे बुजविण्यात आले; परंतु खड्डय़ात टाकलेल्या डांबरमिश्रित खडीवर आवश्यक तेवढा दाब देऊन सपाटीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात डांबरमिश्रित खडी वाहून गेली आणि पुन्हा खड्डे उघडे पडले. त्याशिवाय पावसाच्या तडाख्यात अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून रस्त्यांवर बारीक खडी विखुरली गेली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांच्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे.

 खड्डय़ांचा अंदाजच येईना..

  • गेल्या वर्षी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डय़ांचा शोध घेऊन ते बुजविता यावेत यासाठी प्रोबिटी कंपनीची ‘पॉट होल ट्रेकिंग’ यंत्रणा राबविण्यात येत होती.
  • या यंत्रणेद्वारे अ‍ॅड्रॉइड मोबाइलवरून काढलेले खड्डय़ाचे छायाचित्र या यंत्रणेवर टाकता येत होते. यंत्रणेवर उपलब्ध झालेले छायाचित्र पालिकेच्या रस्ते विभागातील अभियंत्यांना उपलब्ध होई. अभियंते घटनास्थळी जाऊन खड्डय़ाची मोजमापे घेऊन ते बुजविण्यासाठी कंत्राटदाराकडे सोपवीत. त्या वेळी खड्डे ४८ तासांमध्ये बुजविण्याचे आदेश देण्यात आले होते.
  • पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबरच नागरिकही या यंत्रणेवर खड्डय़ांची छायाचित्रे उपलब्ध करीत होते. त्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम जलदगतीने होत होते.
  • मात्र आता पालिकेने फेसबुकच्या माध्यमातून खड्डय़ांच्या तक्रारी करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत नेमके किती खड्डे पडले याची माहिती आजपर्यंत पालिकेला नाही.

Story img Loader