मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत अकरावी प्रवेशासाठीच्या तिसऱ्या नियमित फेरीनुसार ‘तिसरी प्रवेश यादी’ सोमवार, २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. या यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना २२ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येतील. तसेच, १४ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून १७ जुलै रात्री १० वाजेपर्यंत नवीन विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करून वैयक्तिक माहिती अर्जाचा भाग १ भरून तो प्रमाणित करून घेऊ शकतात आणि महाविद्यालय पसंतीक्रम अर्जाचा भाग २ भरता येणार आहे. अर्जाचा भाग २ लॉक असणे बंधनकारक आहे, लॉक असलेले अर्जच महाविद्यालय देण्यासाठी (अलॉटमेंट) विचारात घेतले जाणार आहेत.
संस्थात्मक, अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन या कोटांतर्गतच्या प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना लॉगिनद्वारे १४ जुलै रोजी सकाळी ६ वाजल्यापासून १७ जुलै सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज भरून ऑनलाईन पसंती नोंदविता येईल. त्यानंतर १९ जुलै रोजी संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेश यादी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रसिद्ध केली जाईल, तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कोटांतर्गत प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरून दूरध्वनीवरून संपर्क साधला जाईल. त्यानंतर २२ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोटांतर्गत प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. तसेच, कनिष्ठ महाविद्यालयांना २४ जुलै रोजी रात्री ८ वाजेपर्यंत केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोटांतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवायची आहे आणि पुढील फेरीसाठी २५ जुलै रोजी रिक्त जागा प्रदर्शित कराव्या लागतील.
दरम्यान, मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीअखेर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील जागांवर मिळून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ३९.९४ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. दुसऱ्या नियमित फेरीअंतर्गत केंद्रीय प्रवेशाच्या उपलब्ध असणाऱ्या १ लाख ९५ हजार २०५ जागांसाठी १ लाख ७५ हजार ८ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी ७३ हजार ४३८ विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय देण्यात आले आणि २५ हजार ८२८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. तर, पुढील फेरीसाठी केंद्रीय प्रवेशाच्या १ लाख ६९ हजार ३७७ जागा रिक्त आहेत. यंदा अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील जागांसाठी तब्बल २ लाख ८५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी १ लाख १३ हजार ८४९ (३९.९४ टक्के) विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. तर १ लाख ७१ हजार १८८ विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. तर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील प्रवेश मिळून २ लाख ८६ हजार ७५६ (७१.५८ टक्के) जागा रिक्त आहेत.