मुंबई : सागरी किनारा मार्गावर झालेल्या अपघातात एका १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. अपघातात मोटर चालवत असलेला २२ वर्षीय तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गार्गी चाटे (१९) असे मृत तरुणीचे नाव असून ती प्रभादेवी परिसरात राहात होती. ती मूळची नाशिकच्या गंगापूर येथील रहिवासी असून दक्षिण मुंबईतील एका महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती. संयम साकला (२२) या तरुणासह गार्गी प्रभादेवी येथून शनिवारी रात्री उशिरा ‘स्विफ्ट’ मोटरीने मरिन ड्राईव्हच्या दिशेने जात होते. सागरी किनारा मार्गावरील हाजी अलीच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे मोटार लोखंडी गजांना धडकली व पलटी झाली, अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गार्गीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. जवळून जाणाऱ्या अन्य मोटरगाडी चालकांनी दोघांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल केले. मात्र गार्गीचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असून संयम याच्यावर उपचार सुरू आहेत. ताडदेव पोलीस याप्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने अधिक तपास करीत असून अपघातग्रस्त वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.