मुंबई: मुंबई महापालिकेचा महत्वाकांक्षी असलेला मुंबई किनारा रस्ता प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत सतत पुढे जात असून प्रकल्पाचे संपूर्ण काम पूर्ण केव्हा होईल याची नवीन मुदत अद्याप प्रशासनाने जाहीर केली नाही. प्रकल्प रखडवणाऱ्या लेटलतिफ कंत्राटदारांवर आतापर्यंत ३५ कोटींचा दंड आकारण्यात आला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना पालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.

सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे काम डिसेंबर २०१८ मध्ये सुरू झाले होते. हे काम चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले होते. मात्र टाळेबंदीमुळे हा प्रकल्प रखडला होता. मात्र टाळेबंदीनंतर प्रकल्पाचे काम सुरू झाले तरी अद्याप प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. प्रकल्पाचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. मात्र हिरवळीच्या जागा, वाहनतळ अद्याप तयार नाही. तसेच अजूनही हा रस्ता वांद्रे वरळी सी लिंकला जोडलेला नाही. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत दिलेल्या मुदती पुढे ढकलल्या आहेत. याबाबतची माहिती गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेकडे माहिती अधिकारातून विचारली होती.

हेही वाचा : Ganeshotsav 2024: मध्य रेल्वेच्या २० गणेशोत्सव विशेष रेल्वेगाड्या, ७ ऑगस्टपासून आरक्षण सुरू होणार

मुंबई किनारा रस्ता प्रकल्प विभागाने त्यांना दिलेल्या माहितीनुसार, मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचे काम ३ भागामध्ये विभागले आहे. भाग १ अंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस पर्यंतचे काम मेसर्स लार्सन अँड टुब्रो यास दिले असून त्यांना आतापर्यंत या कामात ११.६३ कोटींचा दंड आकारला आहे. यापूर्वी भाग १ चे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख १२ ऑक्टोबर २०२२ होती. या कामास ९ जून २०२३, १० सप्टेंबर २०२३ आणि २२ मे २०२५ अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

भाग २ अंतर्गत बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतचे काम मेसर्स एचसीसी- एचडीसी यास दिले असून या कामात १६.१३ कोटींचा दंड आकारला आहे. भाग २ चे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख १५ ऑक्टोबर २०२२ होती. या कामासाठी ६ ऑक्टोबर २०२३, ७ ऑक्टोबर २०२३ आणि २५ ऑक्टोबर २०२४ अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

हेही वाचा : मुंबई: गुंगीचे औषध देऊन १४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार

भाग ४ अंतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शनी पार्क पर्यंतचे काम मेसर्स लार्सन अँड टुब्रो यास दिले असून आतापर्यंत या कामात ७.२५ कोटींचा दंड आकारला आहे. भाग ४ चे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख १२ ऑक्टोबर २०२२ होती. या कामास २५ मे २०२३, २६ नोव्हेंबर २०२३ आणि २ एप्रिल २०२४ अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आजतागायत ९१ टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लार्सन अँड टूर्बो तर्फे २३ जुलै २०२४ रोजी लेखी पत्र पाठवून १८१ दिवसाची मुदतवाढ मागितली आहे. त्यात ८ कारणे सांगून मुदतवाढ मागितली आहे, अशी माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.