मुंबई सागरी किनारा प्रकल्प अर्थात कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्याचे काम वेगात सुरू आहे. हा प्रकल्प या वर्षाअखेरीस नोव्हेंबरमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य राज्य सरकारने पालिका प्रशासनापुढे ठेवले होते. हे लक्ष्य गाठता आलं नाही. आता या कोस्टल रोडला पहिला टप्पा जानेवारी २०२४ मध्ये पूर्ण होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ते ‘द सी.एस.आर. जर्नल एक्सीलेन्स अवॉर्ड २०२३’ सोहळ्यात बोलत होते.या कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.
सुधीर मुनगंटीवार यांना दि सीएसआर जर्नल चॅम्पिअन ऑफ गुज गव्हर्नन्स हा पुरस्कार देण्यात आला. तर, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना सी.एस.आर जर्नल पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अभिनेत्री भूमी पेडणेकर, खेळाडू मिताली राज, पद्मश्री डॉ.रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे यांनाही गौरवण्यात आलं.
“आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही सर्व प्रकल्पांना गती दिली. सर्व प्रकल्प सुरू केले. मी एका प्रकल्पाबाबत सांगेन. मुंबईतल कोस्टल हायवे जानेवारीच्या शेवटी मरिन लाईन्स ते वरळी हा पहिला टप्पा खुला होणार आहे. पुढच्या वर्षी त्याच्यापुढील टप्पा सुरू होईल. एमटीएचएल शिवडी-न्हाव्हा शेवा हा लांब सागरी सेतू महिन्याभरात सुरू होणार असून अडीच तासांचा कालावधी अवघ्या १५ मिनिटांवर येणार आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
हेही वाचा >> विश्लेषण: कोस्टल रोड – राज्य सरकारच्या आग्रहामुळे पालिकेपुढे पेच…
“पहिल्या मंत्रिमंडळपासून आतापर्यंत आम्ही सर्व निर्णय सामान्य जनतेसाठी केले. आमचं हे सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांचं सरकार आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणताच सभागृहाच एकच हशा पिकला. पुढे ते म्हणाले, आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे प्रयत्न करू.
मुंबई सागरी किनारा प्रकल्प कसा आहे?
प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत पालिकेतर्फे सागरी किनारी हा मार्ग तयार केला जात आहे. त्याची लांबी १०.५८ किलोमीटर आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झालेला हा प्रचंड मोठा व गुंतागुंतीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत ३४ मीटर रुंदीचे व सुमारे २,१०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी वरळीच्या समुद्रात खांब उभारावे लागणार आहेत. प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राइव्ह) असणाऱ्या स्वराज्य भूमीलगतच्या ‘छोटा चौपाटी’पर्यंत २.८ किमी लांबीचे दोन महाबोगदे तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ ७० टक्क्यांनी वाचणार आहे. समुद्रात भराव घालणे, जमीन तयार करणे, बोगदे खणणे, समुद्रात पूल बांधणे, समुद्री भिंत, समुद्री पथ बांधणे, हिरवळ तयार करणे अशी कामे या प्रकल्पात समाविष्ट आहेत आणि ही सगळी कामे एकाच वेळी सुरू आहेत.