मुंबईतील कोस्टल रोडचे आज (१० मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर तसेच आदी नेते उपस्थित होते. कोस्टल रोडचे उद्घाटन झाले असले तरी सध्या तो पूर्ण दिवस चालू नसेल. या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी एक निश्चित वेळ आखून देण्यात आलीय.
सध्यातरी एकाच मार्गिकेवरून वाहतूक
कोस्टल रोड हा पूर्ण दिवस चालू नसेल. सकाळी आठ ते संध्याकाळी आठ याच काळात सध्या कोस्टल रोडवरून प्रवास करता येणार आहे. सध्या या रोडच्या एकाच मार्गिकेचे काम पूर्ण झालेले असून याच मार्गिकेच्या माध्यमातून वाहतूक सुरू केली जाणार आहे. सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत वाहनांना प्रवेश दिल्यानंतर उर्वरित वेळेत दुसऱ्या मार्गिकेचे काम केले जाणार आहे.
सकाळी आठ ते संध्याकाळी आठच्या दरम्यान प्रवास करता येणार
याबात मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. “ही मार्गिका सकाळी आठ ते संध्याकाळी आठच्या दरम्यान प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. उर्वरित वेळेत दुसऱ्या मार्गिकेचे काम केले जाणार आहे. दुसऱ्या मार्गिकेचे कामही वेगात चालू असून मे महिन्यापर्यंत संपूर्ण प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल,” असे अश्विनी भिडे यांनी सांगितले.
वाहतूककोंडीचा त्रास कमी होणार
दरम्यान, कोस्टल रोडच्या या लोकार्पण सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं. कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचं जगणं आणखी सुकर होईल. मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूककोंडी कमी होईल, असा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केला.