बडय़ा प्रायोजकांच्या माघारीमुळे आयोजनात अडचणी
पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्यांबरोबरच प्रायोजकांच्या आर्थिक मदतीवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सवांनाही बसतो आहे. एरवी नोव्हेंबर महिना सुरू झाला की महाविद्यालयीन महोत्सवांचे नगारे घुमू लागतात; परंतु नोटाबंदी आणि चलनतुटवडा यांमुळे प्रायोजक या महोत्सवांतून अंग काढू लागले आहेत. तर अनेक प्रायोजकांनी पैशांऐवजी वस्तू वा सुविधेच्या रूपात मदत देऊ केली आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयांची पंचाईत झाली आहे.
नोव्हेंबर-डिसेंबर महिना उजाडल्यावर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक वर्तुळामध्ये ‘फेस्टिव्हल’ची धामधूम सुरू होते. आपला कार्यक्रम इतर महाविद्यालयांपेक्षा अधिक आकर्षक आणि धमाकेबाज करण्यासाठी कलात्मकतेबरोबरच त्याच्या अर्थकारणावरही काही विद्यार्थी काम करीत असतात. महाविद्यालयाकडून महोत्सवाला फार तुटपुंजी मदत मिळते. त्यामुळे विद्यार्थी इतर बडय़ा प्रायोजकांच्याही शोधात असतात. मुख्य म्हणजे प्रायोजकांनाही स्वतची प्रसिद्ध करण्यासाठी गर्दी खेचणाऱ्या महाविद्यालयीन कार्यक्रमांची गरज असते. बहुतांश वेळा महोत्सवाचा खर्च प्रायोजकांनी दिलेल्या आíथक मदतीतून भागतो; परंतु पाचशे-हजाराच्या नोटाबंदीचा फटका प्रायोजकांमार्फत होणाऱ्या आíथक उलढालींवरही झाला आहे. त्यामुळे प्रायोजक धुंडाळताना विद्यार्थ्यांचीही चांगलीच दमछाक होताना दिसते आहे.
कार्यक्रमाची आíथक बाजू सांभाळणाऱ्या मुलांना प्रायोजकांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या दारी पायपीट करावी लागत असल्याचे दिसत आहे. मुळात महाविद्यालयीन महोत्सवांना मिळणारे प्रायोजकत्व हे वस्तू आणि देणगी स्वरूपात असते. मोबाइल कंपनी, कपडे विक्री करणारे मोठे ब्रँड अशा तरुणांशी निगडित असणारे घटक खासकरून महाविद्यालयीन महोत्सवांना प्रायोजकत्व देतात. टी-शर्ट, व्हाउचर, वस्तुरूपी बक्षिसे अथवा पशांरूपी देणगी स्वरूपात प्रायोजकत्व देऊन ते आपली प्रसिद्धी करीत असतात. परंतु चलनबंदीच्या निर्णयामुळे बोलणी करून तयार झालेले प्रायोजकही ऐन वेळी वस्तू आणि देणगी देण्यास नकार देत आहेत, असे विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता-मुंबई’शी बोलताना सांगितले. तर काही बडे प्रायोजक अध्रे प्रायोजकत्व पशांनी आणि अध्रे वस्तू स्वरूपात देणार असल्याचे कळते.
चलनबंदीचा निर्णय आल्यानंतर आमच्या दोन प्रयोजकांनी प्रायोजकत्व देण्यास नकार देऊन माघार घेतली. मुळात अशा महाविद्यालयीन कार्यक्रमांना प्रायोजक रोख रकमेने कधीच प्रायोजकत्व देत नाहीत. सर्व व्यवहार हा धनादेशाद्वारे केला जातो. मात्र सध्या प्रायोजक धनादेशानेही मदत करण्यास नकार देत आहेत. – मंगेश करंदीकर, अधिष्ठाता, देवीप्रसाद गोयंका महाविद्यालय.
चलनबंदीच्या निर्णयामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी प्रायोजक सहकार्य करीत आहेत. आमच्या ‘तारांगण’ कार्यक्रमाचे सहप्रायोजक पैशाच्या स्वरूपात संपूर्ण मदत देण्यास तयार झाले होते. मात्र ऐन वेळी आíथक साहाय्याऐवजी वस्तू रूपाने मदत करू, असे त्यांनी सांगितल्याने मोठी पंचाईत झाली आहे. कार्यक्रम २० दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि अजून प्रायोजक धुंडाळणे चालूच आहे. – प्रतीक, मार्केटिंग मेंबर ‘तारांगण’, ठाकूर महाविद्यालय