पुढच्या वर्षी जूनपर्यंत पाण्याचा साठा राखून ठेवण्यासाठी पालिकेने १५ टक्के पाणीकपातीची मात्रा लागू केली असली तरी असमान पाणीवाटपाचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. पाणीकपातीसोबतच पाण्याच्या बदललेल्या वेळांमुळे रात्री जागरण करून पाणी भरून ठेवावे लागत असल्याने रहिवाशांची रोजचीच रात्र ‘कोजागिरी’ची ठरू लागली आहे. तसेच गढूळ पाणी येण्याचे प्रमाण वाढल्याने पोटदुखीसारख्या आजारांची साथ पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्यापासून शेती, अर्थव्यवस्था, रोजगार आदी गुंतागुंतीच्या समस्या उभ्या राहतात हे अनेक वर्षांच्या अभ्यासातून समोर आले आहे. मुंबईतील पाणीकपातीमुळे सध्या तरी या टोकाचे परिणाम दिसत नसले तरी पाण्याच्या प्रतीक्षेत रात्रीची जागरण आणि साथीच्या आजारांची वाढणारी संख्या या समस्या पुढे येऊ लागल्या आहेत. पाणीकपात १५ टक्केच असल्याचे पालिकेचे अधिकारी सांगत असले तरी उच्चभ्रू इमारतींना या कपातीची झळ पोहोचलेली दिसत नाही. पाण्याचा दाब कमी झाल्याने पाणीवाटपाच्या शेवटच्या टोकाला असलेले परिसर व उंचावरील वस्त्यांमध्ये नेहमीच्या तुलनेत ५० टक्के किंवा त्याहून कमी पाणीपुरवठा होतो आहे. पाणीवाटपाच्या समानीकरणासाठी वॉर्ड पातळीवरील अधिकाऱ्यांना लक्ष ठेवण्यास सांगितले असले तरी अनेक ठिकाणी या अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे पाण्याचे समानीकरण करण्याची योजना यशस्वी झालेली नाही. तर असलेल्या अधिकाऱ्यांच्या उपायांनी रहिवाशांच्या त्रासात भरच पडली आहे.
दहिसर कांदरपडा, बोरिवली गोराई, कांदिवली चारकोप, मालाड मार्वे लिंक रोड, एकता नगर तसेच विक्रोळी पार्कसाइट, भांडुप टेंभीपाडा, घाटकोपर, कुर्ला येथील परिसरामध्ये पाणीकपातीचा फटका जास्त जाणवत आहे. दोन तास येणारे पाणी अध्र्या तासात जात असल्याने महिलांना पाण्याच्या वेळेला घराबाहेर पडणेही शक्य होत नाही. त्यातच कुल्र्यासारख्या ठिकाणी पाण्याची वेळ बदलण्यात आली आहे. रात्री साडेआठऐवजी मध्यरात्री अडीच वाजता पाणी येत असल्याने महिलांना रात्रभर जागरण करावे लागते, असे कुर्ला येथील रहिवासी दीप्ती गडगे यांनी सांगितले.
पाण्याचा दाब कमी झाल्याने उंचावरील ठिकाणी पाणीपुरवठा होत नाहीच, शिवाय यामुळे जलजन्य आजार पसरण्याचा धोकाही आहे. शहरात अनेक ठिकाणी जलवाहिनी गटारातून, नाल्यांच्या बाजूने, मलनिसारण वाहिन्यांच्या जवळून जातात. जलवाहिनीला तडे गेले असल्यास सांडपाणी मिसळून त्या भागात दूषित पाण्याचा पुरवठा होतो. पाण्याचा दाब आणि त्यामुळे वेग कमी असल्यास पाणी प्रदूषित होण्याची शक्यता वाढते, असे नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी सांगितले. आधीच अंधेरी, घाटकोपर, कुर्ला या वस्त्यांमध्ये दूषित पाणीपुरवठय़ामुळे पोटदुखीचे प्रमाण अधिक आहे. वर्षभरात शहरातील सुमारे एक लाख रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात पोटदुखीमुळे दाखल होतात. दूषित पाण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने या रुग्णांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता आहे.
पाणीकपात झाल्यापासून रहिवाशांनी पाणी न मिळण्याच्या भीतीपोटी पाणी साठवून ठेवण्यास सुरुवात केली आहे. मलेरिया, डेंग्यू डासांची पैदास होऊ नये यासाठी पाण्याची भांडी दर आठवडय़ाला रिकामी करण्याचा सल्ला पालिकेच्या आरोग्य विभागाकडून दिला जातो. मात्र आता या साठवलेल्या पाण्यामुळे डासांची संख्या वाढण्याचाही धोका आहे, अशी भीती नगरसेविका डॉ. पेडणेकर यांनी व्यक्त केली.