मुंबई : महापालिकेच्या नगरअभियंता खात्यामार्फत २५ फेब्रुवारी रोजी दुय्यम व सहाय्यक अभियंता पदासाठी सरळसेवा भरती परीक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षेत दुय्यम आणि कनिष्ठ संवर्गातील उमेदवारांना देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न छापल्याचा आरोप उमेदवारांकडून होत आहे. तसेच, दोन्ही संवर्गात सारखीच प्रश्नपत्रिका मिळाल्याच्या गोंधळामुळे परीक्षेच्या गुणसंख्येवर परिणाम होणार असल्याची चिंता उमेदवारांना सतावत आहे. परिणामी, चुकीच्या प्रश्नांसाठी सर्व अभियंत्यांना ४ गुण देण्यात यावे, अशी मागणी अभियंता संवर्गाने केली आहे. त्याचबरोबर दोन्ही संवर्गातील उमेदवारांना सारखीच प्रश्नपत्रिका मिळणे, ही बाब धक्कादायक असल्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. तसेच काही अभियंत्यांनी फेरपरीक्षा घेण्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही परीक्षा स्थापत्य विभागातील दुय्यम आणि सहाय्यक अभियंत्यांसाठी घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेत मिलन भुयारी मार्गाचे कंत्राट आणि मिठी नदीसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांची उत्तरे पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्यातील अभियंत्यांव्यतिरिक्त अन्य खात्यातील अभियंत्यांना माहीत असणे गृहीत धरणे चुकीचे असल्याचे स्पष्ट मत म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनने व्यक्त केले आहे. संबंधित परीक्षा इमारत प्रस्ताव व झोपडपट्टी निर्मूलन या विभागासाठी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे त्या विषयानुरूप प्रश्नावली अपेक्षित होती. मात्र, संबंधित प्रश्नपत्रिका पालिकेतील कोणत्याही अभियांत्रिकी खाते प्रमुखांशी सल्लामसलत न करता तयार करण्यात आल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. परीक्षेतील या गोंधळामुळे उमेदवारांचे नुकसान होणार असल्यामुळे चुकीच्या प्रश्नांसाठी ४ गुण देण्यात यावेत, अशीही मागणी अभियंत्यांकडून जोर धरू लागली आहे.

या प्रकरणात नगरअभियंता खाते व आयबीपीएस यांच्यात मेलद्वारे झालेला पत्रव्यवहार लीक झाला असून दोन वेगवेगळ्या पदासाठीच्या प्रश्नांमध्ये साम्य आढळणे, धक्कादायक स्वरूपाची बाब असल्याचे मत म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश भुतेकर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. चौकशीअंती पेपरफुटल्याचे सिद्ध झाल्यास परीक्षेचा निकाल जाहीर करू नये. नव्याने परीक्षा घेण्यात यावी. तसेच, दोषींविरोधात कठोर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.