मुंबई काँग्रेसच्याच मुखपत्रामध्ये थेट माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्यात आल्यामुळे पक्षाच्या १३१व्या वर्धापनदिनीच मुंबईतील काँग्रेसचे नेते अडचणीत सापडले आहेत. मुंबई काँग्रेसकडून काढण्यात येणाऱ्या ‘काँग्रेस दर्शन’ या हिंदी मुखपत्रात पंडीत नेहरूंनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे ऐकले असते, तर आज शेजारील देशांमुळे उदभवणारे प्रश्न निकाली निघाले असते, असे एका लेखात लिहिण्यात आले आहे. पंडीत नेहरूंनी पटेल यांचे ऐकले असते, तर काश्मीरचा, तिबेटचा प्रश्न कधीच निकालात निघाला असता, असाही दावा या लेखात करण्यात आला आहे. हा लेख लिहिणाऱ्याचे नाव देण्यात आलेले नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे विशेष मुखपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
लेखात म्हटले आहे की, वल्लभभाई पटेल यांच्याकडे उपपंतप्रधानपद आणि देशाचे गृहमंत्री पद असले, तरी पंडीत नेहरू आणि त्यांच्यातील संबंध कायम तणावपूर्ण होते. दोघांनीही कायम एकमेकांना राजीनामा देण्याचा इशारा दिला. जर पंडीत नेहरूंनी पटेल यांचा दूरदृष्टीकोन ओळखला असता, तर भारतापुढील अनेक आंतरराष्ट्रीय प्रश्न आज उदभवलेच नसते. पंडीत नेहरूंना १९५० साली लिहिलेल्या एका पत्रात पटेल यांनी चीनबद्दल सावधगिरीचा इशारा दिला होता. चीन हा अजिबात विश्वासार्ह देश नाही आणि तो भविष्यात भारताचा शत्रू ठरू शकतो, असा इशारा पटेल यांनी दिला होता. काश्मिरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेण्यालाही पटेल यांनी त्यावेळी विरोध केला होता, असेही या लेखात लिहिले आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम हे या मुखपत्राचे संपादक आहेत.

Story img Loader