भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना त्यांच्या निवासस्थानी स्थानबद्ध करण्यात आले आहे. निरूपम यांच्या निवासाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात आली आहे. परंतु, पोलिसांच्या या कृतीवर निरूपम यांनी आक्षेप नोंदवला असून एका तडीपाराच्या संरक्षणासाठी पोलीस सभ्य व्यक्तीच्या मागे लागल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Police outside MRCC President @sanjaynirupam house in Andheri west as #BJP Leader @AmitShah visits Mumbai. #ShahFearsNirupam pic.twitter.com/9IVURnihcF
— MumbaiCongress (@INCMumbai) June 6, 2018
माध्यमांशी बोलताना निरूपम म्हणाले की, मी पोलिसांना याबाबत विचारले असता त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत असल्याचे मला सांगितले. अमित शाह मुंबईत आल्यामुळे कदाचित त्यांना आमची भीती वाटत असेल. आम्ही त्यांना अडचणीचे प्रश्न विचारू, त्यांना घेराव घालू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल. आम्ही काय गुन्हा केला आहे की पोलीस आमच्या घराबाहेर उभे आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित करत एका तडीपाराच्या सन्मानासाठी, संरक्षणासाठी पोलीस सभ्य व्यक्तीच्या मागे लागल्याची टीका त्यांनी केली.