मुंबई : रस्त्याचे काम करताना झाडांचे नुकसान केल्या प्रकरणी रस्ते कंत्राटदाराला पालिकेच्या उद्यान विभागाने नोटीस बजावली आहे. तसेच २० हजार रुपयांचे दंड केला आहे. प्रभादेवीतील राजाभाऊ देसाई मार्गावर रस्त्याचे काम सुरू असताना झाडांच्या मुळांची हानी झाल्यामुळे ही कारवाई उद्यान विभागाने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्त्याचे काँक्रीटीकरण करत असताना झाडाच्या बुंध्यालगत सीमेंट टाकले म्हणून काही दिवसांपूर्वी विमानतळ प्राधिकरणाला पालिकेच्या उद्यान विभागाने नोटीस बजावली होती. त्यानंतर लगेचच आता शहर भागातील कंत्राटदारालाही याच कारणास्तव नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदले जात आहेत. तसेच उपयोगिता वाहिन्या टाकण्यासाठी पदपथांचेही खोदकाम करण्यात आले आहेत. त्यामुळे पदपथाकडील झाडांच्या मुळांना हानी पोहोचत आहे. त्यामुळे उद्यान विभागाने गेल्याच आठवड्यात उप अधीक्षकांना झाडांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ज्या झाडांना काँक्रीटीकरणाच्या कामामुळे हानी पोहोचली आहे, ज्या झाडांची मुळे कापली गेली आहेत अशा झाडांचा समतोल राखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या पाहणीअंतर्गत पालिकेच्या ‘जी’ उत्तर विभागातील प्रभादेवी परिसरातील राजाभाऊ देसाई मार्गावर रस्त्यांचे खोदकाम करताना झाडांची मुळे कापली गेली असल्याचे आढळून आले आहे.

झाडाच्या बुंध्याच्या आजूबाजूला १ मीटर लांबी रुंदीच्या चौकोनात काँक्रीटीकरण करू नये, असा नियम असताना त्याचे उल्लंघन झाल्याचे या नोटिशीत म्हटले आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचेही यात म्हटले आहे. झाडांची मुळे कापल्यामुळे भविष्यात विशेषत: पावसाळ्यात झाड उन्मळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.