मुंबईतल्या कुर्ला भागात एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. एसटी रोड शांती नगर समोरील मेट्रो रेल्वेच्या कामाच्या ठिकाणी ही सुटकेस सापडली आहे. याबाबत महिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर उत्तरिय तपासणीसाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत महिलेचे वय २० ते ३० दरम्यान आहे. ही घटना पोलिसांना समजली तेव्हा ते तातडीने या ठिकाणी गेले होते. Latest Marathi News

ज्या महिलेचा मृतदेह आढळला आहे ती महिला नेमकी कोण? हे अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ३०२ या कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.

नेमकी काय घडली घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पात्री १२ ते १२.३० च्या दरम्यान कुर्ला या भागात एक संशयित बॅग सापडल्याचा फोन पोलिसांना आला. सी. एस.टी. रोड शांतीनगरच्या समोरच्या बाजूला मेट्रो रेल्वेचं काम सुरु आहे. त्याच भागात ही संशयित बॅग आढळली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन बॅगेची तपासणी केली असता त्यांना त्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह बॅगेत असल्याने या महिलेची हत्या करुन तो त्यात भरण्यात आला हे स्पष्ट आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. इंडिया टुडेने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

मृत महिलेच्या अंगावर टी शर्ट आणि नाईट पँट

जो मृतदेह पोलिसांना मिळाला त्यात महिलेच्या अंगावर टीशर्ट आणि नाईट पँट असे कपडे आहेत. जी बॅग पोलिसांना घटनास्थळी आढळली ती दुमडलेली होती. हा मृतदेह आढळल्यानंतर कुठली महिला बेपत्ता आहे का? तिच्याविषयी कुणी माहिती मिळवतं आहे का? याचाही शोध पोलीस घेत आहेत. तसंच सीसीटीव्ही फुटेजही पोलीस तपासत आहेत. या महिलेची ओळख पटवण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.