मुंबई : पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून यंदाही नालेसफाई करण्यात येणार असून त्याकरीता पालिका प्रशासनाने शुक्रवारी निविदा मागवल्या. मोठे नाले, लहान नाले, भूमिगत गटारे, मिठी नदी यांच्यामधील गाळ काढण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या सगळ्या कामांसाठी एकूण २६ विविध निविदा परिमंडळाप्रमाणे मागवण्यात आल्या आहेत. प्रथमच दोन वर्षांसाठी कंत्राटदार नेमण्याकरीता निविदा मागवण्यात आल्या आहेत. या कामांचा खर्च ५४० कोटी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबू नये म्हणून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी व नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे केली जातात. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ७५ टक्के गाळ हा पावसाळ्याआधी काढला जातो. तर १५ टक्के गाळ पावसाळ्यादरम्यान आणि १० टक्के पावसाळ्यानंतर काढला जातो. ही कामे दरवर्षी मार्च महिन्यात सुरू होतात. त्याकरीता डिसेंबर महिन्यात निविदा मागवल्या जातात. यंदा मात्र या निविदांना उशीर झाला असून पुढील दोन महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून एप्रिल पासून नालेसफाईच्या कामांना सुरूवात करावी लागणार आहे. त्यामुळे यंदा ही कामे एप्रिल महिन्यात होणार का याबाबत शंका आहे.

नालेसफाईसाठी दरवर्षी एका वर्षाकरीता निविदा मागवल्या जातात. यंदा मात्र प्रथमच दोन वर्षांसाठी निविदा मागवल्या जात आहेत. गेल्यावर्षी नालेसफाईसाठी पालिका प्रशासनाने २५० कोटी खर्च केले होते. यंदा दोन वर्षांसाठी मिळून ५८० कोटी रुपयांपर्यंत हा खर्च केला जाणार आहे. दरवर्षी मिठी नदीसाठी दोन वर्षांचे कंत्राट दिले जाते. मिठी नदीचे दोन वर्षांचे कंत्राटही संपले असून यंदा सर्व नाले व मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी दोन वर्षांचे कंत्राट दिले जाणार आहे.

नालेसफाई अंदाजित खर्च

शहर भाग …३९.४५ कोटी

पूर्व उपनगरे …..१४८.३९ कोटी

पश्चिम उपनगरे ….२५७.३५ कोटी

मिठी नदी …९६ कोटी

मुंबईतील मोठे नाले, लहान नाले तसेच मिठी नदी यांची एकूण लांबी सुमारे ६८९ किमी आहे.

मुंबई व उपनगरात ३०९ मोठे नाले, १५०८ लहान नाले, रस्त्याच्या कडेला असलेली २०००किमी लांबीची गटारे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai corporation going to spend 540 crore for cleaning the drains before monsoon mumbai print news asj