प्रभाग समितीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेल्या विकासनिधीमधून मतदारसंघामध्ये छोटी-मोठी कामे करण्यास पालिका प्रशासनाने नगरसेवकांना अनुमती दिली आहे. त्यामुळे आता खासदार-आमदारांप्रमाणे नगरसेवकांनाही मतदारसंघात छोटी-मोठी नागरी कामे आणि नागरिकांना सुविधा उपलब्ध करणे शक्य होणार आहे.
खासदार आणि आमदार आपापल्या निधीतून झोपडपट्टय़ांमध्ये पायवाटा, शौचालये, स्नानगृहे, दिवाबत्ती, पाणीपुरवठय़ासाठी विविध योजना राबवित असतात. परंतु नगरसेवक निधीतून ही कामे करता येत नाहीत. त्यामुळे ही नगरसेवकनिधी अथवा प्रभाग समिती निधीतून करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात येत होती. नगरसेवकांना छोटय़ा-मोठय़ा कामांसाठी ६० लाख रुपये नगरसेवक निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्याशिवाय प्रभागांमध्ये लहान-मोठी कामे करण्यासाठी नगरसेवकांना प्रत्येकी १० ते १५ लाख रुपये प्रभागनिधीही उपलब्ध करण्यात आला आहे. मात्र झोपडपट्टय़ांमध्ये पायवाटा, शौचालये, स्नानगृहे, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, लहान रस्त्यांची दुरुस्ती, मोऱ्या-नाल्यांची कामे, उद्याने आणि अन्य ठिकाणी बसण्यासाठी बाकडे, उद्यानांमध्ये खेळाचे साहित्य, टेकडय़ांवर संरक्षक भिंत, स्मशानांमध्ये सुविधा, झोपडपट्टय़ांमध्ये सौर दिवे आदी कामे नगरसेवकांना करता येत नव्हती. मात्र आता प्रभाग निधीतून ही कामे करण्याची परवानगी प्रशासनाने नगरसेवकांना दिल्याने नगरसेवकांनाही आपल्या मतदारसंघात कामे करणे शक्य होणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा