स्वसंरक्षणार्थ केलेला प्रहार गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या कारणाअंतर्गत तीन वर्षे तुरुंगात असलेल्या एका महिलेची जामिनावर सुटका करण्यात आली. एका व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी ३१ वर्षीय तरुणीला तुरुंगात टाकण्यात आलं होतं. परंतु, आता तिची जामिनावर सुटका करण्यात आली. फ्री प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
२० जून २०२१ रोजी एका महिलेला अटक करण्यात आली. मध्यरात्री २.३० वाजता या महिलेने या व्यक्तीच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केली. या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारांपूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आलं. या घटनेच्या एका साक्षीदाराने महिलेने दगड डोक्यात टाकल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा जबाब न्यायालयात दिला. परिणामी महिलेवर गुन्हा दाखल झाला.
या महिलेने तीन वर्षांचा तुरुंगवास भोगला. परंतु, त्यांचे वकील एसएस सावलकर यांनी या महिलेच्या जामिनासाठी अर्ज केला. त्यांनी केलेल्या युक्तीवादामुळे या महिलेला जामिनावर सोडण्यात आलं आहे.
फिर्यादीचा युक्तीवाद काय?
साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार फक्त एकच मार लागला होता, परंतु पोस्टमॉर्टम अहवालात असे दिसून आले आहे की सुमारे सहा जखमा होत्या. तर, फिर्यादीने असा युक्तिवाद केला की हा हल्ला स्वसंरक्षणासाठी करण्यात आला नव्हता. कारण यात सहा जखमा झाल्या होत्या.जर स्वतःला वाचवायचे असेल तर महिलेने एक किंवा दोन फटके मारले असते, परंतु सहा वार हे स्पष्टपणे दर्शविते की हत्या जाणूनबुजून झाला आहे.
महिलेच्या वकिलाचा युक्तीवाद काय?
ही महिला अत्यंत गरीब असून तिचे कोणीही नातेवाईक नाही. हा स्वसंरक्षणाकरता केलेला हल्ला होता. विचित्र वेळेस एकाकी स्त्रीला या व्यक्तीने अयोग्यरित्या स्पर्श केला होता. म्हणून, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आरोपीची ही स्वाभाविक प्रतिक्रिया होती.
न्यायालयाने काय म्हटलं?
न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि जामीन मंजूर करताना असे निरीक्षण नोंदवले, “अर्जदार महिला आहे आणि संबंधित वेळी तिचे वय ३१ वर्षे होते. ही घटना मध्यरात्री २ वाजता घडली. महिलेने अयोग्यरित्या स्पर्श केल्यामुळे मृत व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचं प्राथमिक अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. तर, पोस्टमॉर्टम अहवालात असे दिसून येते की संबंधित वेळी मृत व्यक्ती दारूच्या नशेत होता. या सर्व परिस्थितींचा विचार केल्यास योग्य आकलनानुसार, महिलेच्या वकिलाचे युक्तिवाद योग्य असल्याचे दिसून येते.”