नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी यांना अटक करण्यात अपयशी ठरल्यानेच ते भारत सोडून पळून गेलेत, असं मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात ईडीला सुनावलं. चार्टर्ड अकाऊंट व्योमेश शाह यांच्या याचिकेला परवानगी देताना उच्च न्यायालयाने या तिघांचा मुद्दा अधोरेखित केला. चार्टर्ड अकाऊंट व्योमेश शाह यांनी परदेशात जाण्यासाठी प्रत्येकवेळी न्यायालयाची परवानगी घेण्यापासून सूट द्यावी, याकरता याचिका केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चार्टर्ड अकाऊंट व्योमेश शाह यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील प्रॉपर्टी डिलर J&K बँकेला १०० कोटी रुपयांचे नुकसान केल्याबद्दल गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. शाह यांनी विशेष न्यायालयात जामीन आदेशात बदल करण्याची मागणी केली होती. या जामीन आदेशात न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडू नये असे सांगण्यात आले होते. परंतु, शाह यांना सातत्याने परदेशी वाऱ्या कराव्या लागतात. ग्राहक आणि कामाच्या शोधात विविध देशांमध्ये जावं लागतं. त्यामुळे प्रत्येकवेळी न्यायालायची परवानगी घेणं व्यवहार्य ठरत नाही. त्यामुळे न्यायालयाची परवानगी न घेता परदेशात जाता यावं अशी मागणी करणारी याचिका शाह यांनी केली होती. परंतु, ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. कारण, उद्योगपती मोदी, मल्ल्या आणि चोक्सी यांच्यासारखीच शाह यांचीही परिस्थिती निर्माण होईल.

हेही वाचा >> विश्लेषण: मल्या, मोदी, चोक्सी यांचे प्रत्यार्पण का रखडले? ही मंडळी कधी तरी भारतात पाठवली जातील का?

नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी या लोकांना योग्य वेळी अटक करण्यास संबंधित तपास यंत्रणा अपयशी ठरल्याने ते पळून जाण्यास यशस्वी ठरले, असं विशेष न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी ईडीला सुनावलं.

कोट्यवधींचा घोटाळा करून तिघेही फरार

विजय मल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी हे २२ हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाला हवे आहेत. गुन्हे दाखल होण्याआधीच ते परदेशात पळून गेले आहेत. आता पाच वर्षे उलटून गेली तरी त्यांना भारतात परत आणण्यात यश आलेले नाही. १३ हजार कोटींच्या बँक घोटाळ्यात हवा असलेला फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला भारताच्या ताब्यात देण्यास अँटिग्वा अँड बार्बुडा या टिकलीएवढ्या देशाने अलीकडेच नकार दिला आहे. मल्या आणि मोदी यांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. भारतीय तपास यंत्रणा त्यांचा प्रत्यक्षा ताबा घेण्यात का यशस्वी होत नाहीत.

मल्या, मोदी, चोक्सी घोटाळा काय?

किंगफिशर एअरलाईन्सच्या नावावर नऊ हजार कोटींच्या बँक कर्ज घोटाळ्यात विजय मल्या याचा संबंध आहे. गुन्हा दाखल होताच तो लंडनला पळून गेला. त्याच्या प्रत्यार्पणाचा आदेश झाला असला तरी त्याचा प्रत्यक्ष ताबा मिळण्यासाठी अजून किती कालावधी लागेल याची तपास यंत्रणांनाही कल्पना नाही. पंजाब नॅशनल बँकेला साडेतेरा हजार कोटींना फसविल्याप्रकरणी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्यावर गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याची कुणकुण लागताच तोही लंडनमध्ये पळून गेला. भारतीय तपास यंत्रणेच्या विनंतीवरून २०१९मध्ये मोदीला अटक झाली. त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू असून त्याविरुद्ध त्याने अपील केले आहे. नीरव मोदी याचा काका मेहुल चोक्सी याचाही या घोटाळ्यात समावेश आहे. तोही भारतातून पळून गेला. मात्र त्याने अँटिग्वा आणि बार्बुडा या देशात आश्रय घेतला. त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू असली तरी अलीकडे त्याचा ताबा देण्यात तेथील न्यायालयाने नकार दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai court raps ed over fugitives nirav modi vijay mallya mehul choksi sgk
Show comments