Mumbai Crime : रात्री उशीरा महिलांना व्हॉट्सअॅपवर मॅसेज पाठवणाऱ्या एका पुरूषाला मुंबई न्यायालयाने दणका दिला आहे. रात्री उशीरा महिलेला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवल्याच्या प्रकरणात या व्यक्तीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अनोळखी महिलेला रात्री उशिरा व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून, “तू बारीक आहेस. तू खूप स्मार्ट दिसतेस. तू गोरी आहेस, मला तू आवडते. तुझं लग्न झालं आहे की नाही?”, असे विचारणे तिचा विनयभंग करण्यासारखे ठरेल, असे नमूद करत मुंबई सत्र न्यायालायाने एका माजी नगरसेविकेला आक्षेपार्ह मेसेज पाठवणार्या व्यक्तीची शिक्षा कायम ठेवली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डीजी ढोवले यांनी नमूद केले की, २६ जानेवारी २०१६ रोजी पीडित, ज्या तेव्हा मुंबईतील बोरीवली भागतील नगरेसविका होत्या, त्यांना व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवण्यात आले. त्यामध्ये म्हटले होते की, “तू झोपलीस का? तुझं लग्न झालं आहे की नाही? तू स्मार्ट दिसत आहेस. तू खूप गोरी आहेस. मला तू आवडतेस. माझं वय ४० वर्ष आहे. मी तुला उद्या भेटतो” न्यायधीशांनी पुढे सांगितले की, जेव्हा पीडित महिलेने याबद्दल पतीला सांगितलं आणि त्या अनोळखी फोन नंबरवर कॉल केला तेव्हा, ज्याचा हा फोन नंबर होता त्या नरसिंह गुडे याने फोन घेतला नाही, मात्र त्याने पुन्हा मॅसेज पाठवला की – “सॉरी, रात्री कॉल स्वीकारत नाही. मला व्हॉट्सअॅप चॅटिंग करायला आवडतं, ऑनलाईन ये” याबरोबरच त्याने काही अश्लील फोटो आणि मेसेज देखील पाठवले.
१८ फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात, न्यायाधीशांनी असे नमूद केले की .मेसेज आणि फोटे खरोखरच अश्लील आहेत आणि आरोपी गुडे आणि पीडितेमध्ये किंवा माजी नगरसेवक असलेल्या तिच्या पतीमध्ये कोणताही संबंध देखील नाही.
कोणतीही विवाहित महिला किंवा तिचा पती, जे प्रतिष्ठित आणि नगरसवेक आहेत, रात्री ११ ते साडेबारा दरम्यान पाठवलेले असे मेसेज आणि अश्लील फोटो सहन करणार नाहीत, विशेषतः जेव्हा त्यांचं पाठवणाऱ्याशी कसलाही संबंध नाही. कथित मेसेजमधील शब्द आणि वर्तवणूक ही महिलेचा विनयभंग (आयपीसी कलम ५०९ अंतर्गत) करणारे ठरते, असे न्यायालयाने म्हटले. अश्लील फोटो आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवणे हे माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या कलम ६७ आणि ६७अ अंतर्गत शिक्षेसाठी पात्र ठरते असेही न्यायालयाने म्हटले. लाईव्ह लॉने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
तक्रारदारा महिलेने दिलेल्या माहितीनुसार महिलेने पोलिसांकडे धाव घेतली कारण, हे मेसेज मिळाल्यानंतर तिला लाज वाटली आणि राग आला. मात्र बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला की अशी कोणतीही घटना घडली नाही आणि तक्रारदार आणि तिच्या पतीचे आरोपीशी राजकीय वैर असल्याने अशा प्रकारे राजकीय प्रभाव वापरून तक्रारदाराने खोटा गुन्हा दाखल केला.
कोर्टाने युक्तीवाद फेटाळला
मात्र कोर्टाने हा युक्तीवाद फेटाळला आहे. कोणतीही महिला खोट्या प्रकरणात आडकवून स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावणार नाही. त्यामुळे तक्रारदार आणि तिचा पती यांनी तोंडी आणि कागदपत्री पुरावे सादर करत केलेली तक्रार सिद्ध करते की महिलेला संबंधित दिवशी मेसेज आणि अश्लील फोटो मिळाले होते.
ते मेसेज आणि फोटो आरोपीने पाठवलेले नाहीत या युक्तीवादावर न्यायाधीश म्हणाले की, जर अपिलकर्त्यालाच त्याच्या फोन वापराबद्दल माहिती असेल, तर हे मेसेज त्याच्या नंबरवरून कसे पाठवण्यात आले हे स्पष्ट करण्याची जबाबदारी त्याच्यावर येते. कोणतेही विश्वसनीय कारण देण्यास यशस्वी न ठरल्याने न्यायालय हे त्याच्या विरोधातील निर्णयापर्यंत पोहचले. मेसेज पाठवणाऱ्याची ओळख ही विनाकारण गृहित धरण्यात आलेली नाही, तर ती परिस्थितीजन्य पुरावे, कागदपत्रांद्वारे सादर केलेल्या पुरवे यांच्या आधारावर निश्चित करण्यात आली असल्याचेही न्यायालयाने यावेळी सांगितले.
याप्रकरणात न्यायालयाने गुडे यांना ठोठावण्यात आलेला तीन महिन्यांचा साधा कारावास आणि दंडाची शिक्षा कायम ठेवली. यासह न्यायालयाने बोरिवली येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने दिलेल्या शिक्षेविरुद्ध गुडे यांनी दाखल केलेले याचिका फेटाळून लावली.