मुंबई : मृतदेहाच्या पिशव्या खरेदीप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावून बुधवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. पण पेडणेकर यांनी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी मागितला असून त्याला ईडीकडून अद्याप कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. दरम्यान, ईडी लवकरच पेडणेकर यांना दुसरे समन्स बजावणार असून त्यांना २३ नोव्हेंबर रोजी पुन्हा चौकशीला बोलवण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा >>> मुलगा हवा म्हणून चार महिन्यांच्या मुलीला ठार केल्याचा आरोप ; महिलेला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
पेडणेकर या ईडीच्या चौकशीला बुधवारी अनुपस्थित राहिल्या. त्याच्यावतीने त्यांचे वकील राहुल आरोटे ईडी कार्यालयात आले होते. यावेळी आरोटे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पेडणेकर या आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी येणार नसून आम्ही ईडी कार्यालयाकडे त्यांना हवे असलेले कागदपत्र जमा करण्यासाठी वेळ मागितला आहे, असे सांगितले. तसेच आम्ही चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे. त्यावर आता ईडी काय उत्तर देते हे पाहणार आहोत. मात्र आज किशोरी पेडणेकर चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत. मी त्यांची बाजू मांडण्यासाठी ईडी कार्यालयात आलो होतो आणि त्या संबंधित पत्र व्यवहार केला असल्याचे आरोटे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ईडीकडून पेडणेकर यांना गुरूवारी ई-मेलद्वारे उत्तर देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडी त्यांना २३ नोव्हेंबर रोजी पुन्हा चौकशीला बोलवणार असून त्याबाबत दुसरे समन्स बजावण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मृतदेहाच्या पिशव्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी मंगळवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांची ईडीने सहा तास चौकशी केली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ५ ऑगस्ट रोजी याप्रकरणी पेडणेकर यांच्यासह वेदान्त इनोटेक प्रा. लि, तत्कालिन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, मध्यवर्ती खरेदी विभागाचे (सीपीडी) तत्कालिन उपायुक्त व अनोळखी सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ४९ लाख ६३ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीनेही नुकताच गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली होती.