मुंबई : महानगरपालिकेच्या उद्यान खात्याने चांदिवली येथील नाहर अमृत शक्ति गार्डनमध्ये मियावाकी पद्धतीने लावलेल्या झाडांचा उपक्रम यशस्वी झाला आहे. जवळपास सहा वर्षांपूर्वी येथे लागवड करण्यात आलेली तब्बल ४१ हजार झाडे चांगलीच बहरली असून मुंबईत घनदाट जंगलाची निर्मिती होत आहे. या जंगलात देशी प्रजातीची ७९ झाडे असून त्यात जांभूळ, अर्जुन, पळस, मोह, आंबा, पिंपळ आदी झाडांचा समावेश आहे. या जंगलामुळे मुंबईकरांना निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे.
मुंबईतील उष्णता कमी करणे, हिरवळ वाढवणे, तसेच हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम व उपायोजना करण्यात येत आहेत. पालिकेच्या उद्यान खात्यातर्फे वेळोवेळी शहरात वृक्षारोपण केले जाते. मुंबईत जागेची कमतरता असल्यामुळे मियावाकी (अति घन वृक्षलागवड) पद्धतीने वृक्षलागवड करण्यावर उद्यान खाते भर देत आहे. त्यानुसार, चांदिवलीतही मोठ्या प्रमाणात मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करण्यात आली होती. मुंबई महानगरपालिकेला एका विकासकाने गेल्या काही वर्षांपूर्वी चांदिवली येथील मोठा भूखंड हस्तांतरित केला होता. महानगरपालिकेने तब्बल १६ हजार चौरस मीटर जागेत वृक्षलागवडीचा निर्णय घेतला. त्यानुसार जानेवारी २०२० मध्ये या जागेत एकूण ४१,२०७ झाडे लावली. वृक्षारोपणानंतर झाडांची योग्य देखभाली केल्यांनतर काही वर्षातच झाडांची वेगाने वाढ होऊ लागली. सध्या या भूखंडावर मियावाकी जंगल निर्माण झाले असून मुंबईकरांना काहीच वर्षात चांदिवलीत घनदाट जंगलाचा अनुभव घेता येणार आहे. चांदिवली येथील नाहर अमृत शक्ति गार्डनमध्ये लावण्यात आलेल्या ७९ देशी प्रजातीच्या हजारो झाडांची लागवड करण्यात आली असून त्यात जांभूळ, अर्जुन, पळस, मोह, आंबा, पिंपळ यांसारख्या झाडांचा समावेश आहे.
या निसर्गरम्य जागेबाबत मुंबईकरांना माहिती मिळावी, तसेच पर्यावरणाविषयी जनजागृती करणे व अधिकाधिक मियावाकी वनांची निर्मिती करणे या उद्देशाने नुकतेच या ठिकाणी शाश्वत शहरी वनस्पती संवर्धन व पर्यावरण संरक्षणावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उद्यानतज्ज्ञ, अर्बोरिस्ट आणि महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील अधिकारी उपस्थित होते.
उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी मियावाकी जंगल यशस्वी होण्यामागील बारकावे सांगून शहराचे पर्यावरण आरोग्य सुधारण्यात शहरी वनसंवर्धन व अर्बोरिकल्चर तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले. वृक्षांचे मूल्यमापन नागरिकांच्या आरोग्यावर कसे सकारात्मक परिणाम करते आणि शहरी जीवनमान सुधारण्यासाठी त्याचे महत्त्व किती, याबाबत अर्बोरिस्ट विवेक राणे यांनी मार्गदर्शन केले.