मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये अजिंक्य नाईक यांचा विजय झाला आहे. अजिंक्य नाईक यांनी संजय नाईक यांचा पराभव केला. या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांना २२१ मतं मिळाली तर संजय नाईक यांना ११४ मतं मिळाली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची समजली जाते. या निवडणुकीत महायुती पुरस्कृत असलेले उमेदवार संजय नाईक यांना पराभवाला सामोर जावं लागलं. तर महाविकास आघाडी पुरस्कृत असलेले उमेदवार अजिंक्य नाईक यांचा विजय झाला आहे.

मुंबई क्रिकेट असोसिशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे मुंबई क्रिकेट असोसिशनचं अध्यक्षपद रिक्त होतं. यानंतर मुंबई क्रिकेट असोसिशनच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गटाकडून संजय नाईक निवडणुकीच्या मैदानात होते. तर शरद पवार गटाकडून अजिंक्य नाईक निवडणुकीच्या मैदानात होते. या निवडणुकीत आशिष शेलार गटाचे संजय नाईक यांचा पराभव झाल्यामुळे आशिष शेलार यांना धक्का बसला.

हेही वाचा : “भाजपाला पाठिंबा देणाऱ्या चंद्राबाबू, नितीश कुमारांना…”, बजेटवरून राष्ट्रवादीचा टोला; म्हणाले, “महाराष्ट्राला मात्र…”

मुंबई क्रिकेट असोसिशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवलेल्या अजिंक्य नाईक यांची आता अध्यक्षपदी वर्णी लागली असून वयाच्या ३८ व्या वर्षी अजिंक्य नाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले आहेत. दरम्यान, या विजयानंतर अजिंक्य नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधत हा विजय अमोल काळे यांचा असल्याचं म्हटलं आहे.

अजिंक्य नाईक काय म्हणाले?

“मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे क्लब मेबर्स आहेत, हा त्यांचा विजय आहे. सर्व क्रिकेटरचा आम्हाला सपोर्ट होता. ही निवडणूक दु:खाची होती. हा विजय अमोल काळे यांचा आहे. त्यांचा वारसा पुढे सुरु ठेवण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढलो आणि त्यामध्ये आम्हाला यश मिळालं. शरद पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी आम्हाला सपोर्ट केला. सर्वांचे मी आभार मानतो आणि अशाच प्रकारे मी क्रिकेटसाठी काम या पुठे करणार आहे. आता क्रिकेटसाठी जेवढं काम करता येईल तेवढ करणार आहे”, अशी प्रतिक्रिया अजिंक्य नाईक यांनी दिली.

Story img Loader