मुंबईतील गोवंडी येथील शिवाजी नगर पोलिसांनी एका ६२ वर्षीय व्यक्तिला १६ वर्षीय सावत्र मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पीडित अल्पवयीन मुलीला नशेच्या अमलाखाली आणून आरोपी तिच्यासोबत दुष्कृत्य करायचा. चार महिने अत्याचार केल्यानंतर मुलगी गर्भवती झाली. विशेष म्हणजे सदर आरोपी याआधीच नातेवाईकाचा खून केल्याप्रकरणी १९ वर्षांची शिक्षा भोगून आलेला आहे. या शिक्षेतून कोणताही धडा न घेता आरोपीने सावत्र मुलीसोबत विकृत असा प्रकार केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पीडित मुलीच्या आईसोबत लग्न केले होते. सदर महिलेच्या मुलीला आपल्यासोबतच ठेवूया यासाठी आरोपीने पत्नीचे मन वळविले. मात्र लग्नानंतर आरोपीचा स्वभाव चांगला नसल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने त्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीबरोबर संसार थाटला. शिवाजी नगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जून राजने यांनी सांगितले की, सात महिन्यांपूर्वीच आपल्या मुलीला आरोपी पतीसोबत ठेवून ही महिला गोवंडी येथे राहायला गेली होती.
हेही वाचा >>> अत्याचाराची तक्रार करणाऱ्या महिलेचा दाऊद गँगशी संबंध? राहुल शेवाळेंच्या दाव्याने खळबळ, नवाब मलिकांचे नाव घेत म्हणाले…
पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, यावर्षी मार्च ते जून महिन्याच्या कालावधीत पीडित मुलगी आपल्या सावत्र पित्यासोबत राहत होती. याकाळात नराधम बाप मुलीला नशेचा पदार्थ द्यायचा आणि त्यानंतर तिच्यासोबत दुष्कृत्य करायचा. काही दिवसांनी मुलीच्या वागण्यातील बदल पाहून मुलीच्या आईला संशय आला आणि सत्य कळल्यानंतर आईने पोलिसांत तक्रार दाखल केली.
हेही वाचा >>> आत्महत्या केलेली अभिनेत्री तुनिषा शर्मा होती गरोदर? बॉयफ्रेंडचा उल्लेख करत पोलिसांच्या सुत्रांनी दिली धक्कादायक माहिती
पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल
पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याचे समजले. मात्र तोपर्यंत सुरक्षित गर्भपात करण्याची वेळ निघून गेली होती. पोलीस निरीक्षक राजने यांनी सांगितले की, या प्रकरणातील सत्यता पडताळण्यासाठी डीएनए टेस्ट केली जाणार आहे. सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी पोलीस कोठडीत आहे. चार्जशीट दाखल करण्याआधी साक्षीपुरावे, फाँरेसिंक रिपोर्ट गोळा केले जाणार आहेत. आरोपीवर पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.