मुंबई : वडाळा येथे बेकायदेशीरपणे वास्तव्यास करणाऱ्या अफगाणी नागरिकाला गुन्हे शाखेने अटक केली असून हबीबुल्लाह प्रांग ऊर्फ जहीर अली खान असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे बनावट कागदपत्रे सापडली आहेत. गेल्या १७ वर्षांपासून हबीबुल्लाह मुंबई शहरात वास्तव्यास असून त्याने भारतीय नागरिक असल्याची बनावट कागदपत्रे तयार केली आहेत. वडाळा परिसरात काही अफगाणी नागरिक बेकायदेशीपणे वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ५ च्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे प्रभारी पोलीस निरीक्षक धन:श्याम नायर, सदानंद येरेकर, सुनिता भोर, अजित गोंधळी यांच्या पथकाने परिसरात कारवाई करून बहुबुल्लाह या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
हेही वाचा : Manohar Joshi Passes Away : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन
पोलिसांना त्याच्याकडे जहीर नावाचे पॅनकार्ड आणि वाहनचालक परवाना सापडला. तो भारतीय नागरिक असल्याचे सांगत होता. मात्र तो चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने आपण अफगाणी नागरिक असल्याची कबुली दिली. तसेच २००७ पासून मुंबईत वास्तव्यास असल्याचेही त्याने सांगितले. त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अफगाणी पॅनकार्ड, अफगाणी नागरिक असल्याचे ओळखपत्र, व्हॅक्सीनेशन प्रमाणपत्र जप्त केले. आरोपीला न्यायालयाने २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.