मुंबई : हॉटेल व्यावसायिकाकडे अडीच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली गँगस्टर डी. के. रावसह सात जणांविरोधात गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी व्यावसायिकाला धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी खंडणी विरोधी पथक अधिक तपास करत आहे.

डीके रावसह सात जणांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तक्रारीनुसार, गुन्हे शाखेकडे एका हॉटेल व्यावसायिकाकडून तक्रार आली होती. त्यात गँगस्टर डी.के. राव आणि इतर सहा जणांनी कट रचून त्यांचे हॉटेल ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तसेच अडीच कोटींची खंडणी मागितली आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

डी.के. रावसह सर्व सात आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. डी के राव याच्यावर २२ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्यामध्ये मारामारी, खंडणीसाठी अपहरण, खुनाचा प्रयत्न अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच तो छोटा राजनचा हस्तक आहे.

Story img Loader